नंदुरबार l प्रतिनिधी-
गंगामाई बहुउद्देशीय महिला मंडळ चोपडा व कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन नंदुरबार नगरपालिकेचे नगरसेवक किरण रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी आयोजित शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक कुणाल वसावे, शिबिराचे आयोजक व नगरसेवक रविद्र पवार ,महिला व बालकल्याण समिती सभापती शितल वसावे , हर्ष भट, जितेंद्र अहिरे,श्याम कासार उपस्थित होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिबिरामध्ये अनुभवी नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची सखोल तपासणी केली. विशेषतः मोतीबिंदू या नेत्ररोगाबाबत तपासणी, निदान व मार्गदर्शन करण्यात आले. अनेक रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे प्राथमिक लक्षणे आढळून आल्याने त्यांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेबाबत आवश्यक सल्ला देण्यात आला.
यावेळी डॉक्टरांनी मोतीबिंदू आजाराची कारणे, लक्षणे व वेळेवर उपचार न केल्यास होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली. तसेच नियमित नेत्र तपासणी करणे, डोळ्यांची काळजी घेणे व अंधत्व टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
या शिबिराचा लाभ वृद्ध नागरिकांसह महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने घेतला. गंगामाई बहुउद्देशीय संस्था व कांता लक्ष्मी शहा नेत्र रुग्णालयाच्या या उपक्रमामुळे गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.अशा प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम भविष्यातही राबविण्यात येणार असल्याचे आयोजकानी यावेळी सांगितले.








