नंदुरबार l प्रतिनिधी-
नाशिक आणि जळगाव येथील आयकर टीडीएस पथकांनी आयकर आयुक्त टीडीएस रेंज नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली 22 जानेवारी 2026 रोजी जळगाव येथील जैव-खते, सूक्ष्म पोषक घटक, जैव-उत्तेजक आणि कीटकनाशके उत्पादन व्यवसायात गुंतलेल्या एका आस्थापनेच्या कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करुन रुपये 50 लाखाहून अधिक रक्कम केंद्र शासनाच्या खात्यात जमा केली असल्याची माहिती जळगांव आयकर अधिकारी मनु भारद्वाज यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
दिवसभर चाललेल्या या तपासणीत विविध कागदपत्रांची सखोल चौकशी करण्यात आली चालू आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कंपनीने खरेदी-विक्री केली असतानाही, कापलेला टीडीएस/टीसीएस केंद्र सरकारच्या खात्यात जमा केला गेला नसल्याचे आढळून आले. या अनियमिततेमुळे, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत आस्थापनेकडून थकबाकीपैकी 1,02,00,000/- रुपये म्हणजेच 50 लाखांहून अधिक रक्कम केंद्र सरकारच्या खात्यात जमा करून घेतली. कंपनीच्या संचालकांनी उर्वरित टीडीएस लवकरच भरण्याचे आश्वासन दिले आहे.
आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की, एकदा टीडीएस कापला की तो ‘सरकारी पैसा’ बनतो आणि त्याचा गैरवापर कोणीही करु नये, कंपन्या, ट्रस्ट, सोसायट्या आणि इतरांनी वेळेवर टीडीएस भरणा आणि टीडीएस/टीसीएस रिर्टन भरण्याचा फॉर्म 26 एएस आणि एआयएसशी नियमित जुळवून घ्यावा. जाणूनबुजून केलेल्या थकबाकीदारांना व्याज, मोठा दंड आणि आयकर कायदा 1961 नुसार लागू असलेल्या खटल्यासारख्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, त्यामुळे सर्व संबंधितांनी टीडीएस/टीसीएस तरतुदींचे काटेकोर पालन करण्याचे आणि वेळेवर टीडीएस/टीसीएस कापून जमा करावे, असेही आवाहन जळगांव आयकर अधिकारी श्री.भारद्वाज यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.








