शहादा l प्रतिनिधी
शहरातील डम्पिंग ग्राउंड वर कोट्यावधी रुपये खर्च करूनही सद्यस्थितीत कचरा सुरक्षित व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापित होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. कचरा वर्गीकरण ,नियमित उचल ,सुरक्षित साठवणूक व आधुनिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा स्पष्ट सूचना शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी स्वच्छता अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिला.
शहाद्याचे नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शुक्रवारी सकाळी शहराबाहेरील दोंडाईचा रस्त्यावर असलेल्या डंपिंग ग्राउंड ला भेट देत तेथील परिस्थिती ची पाहणी करीत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण डम्पिंग ग्राउंड ची पाहणी करतेवेळी स्वच्छता विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अशी स्थिती का निर्माण झाली याची माहिती घेत बांधकाम व स्वच्छता विभागाने परस्पर समन्वय साधून प्रश्न तात्काळ सोडवण्याचे सांगितले. या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आजार व पर्यावरणीय धोके निर्माण होत असल्याचे त्यांनी कर्मचाऱ्यांना निदर्शनास आणून दिले. तसेच संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेशही दिले. दोंडाईचा रस्त्यावर पडलेला कचरा तात्काळ उचलून स्वच्छता करण्याची ही आदेश दिले. डम्पिंग ग्राउंड ला लागून शेत शिवार रस्ता आहे तो रस्ता ही स्वच्छ करून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबतही त्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. शहरातील गोळा होणारा कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मितीच्या प्रकल्प आहे.परंतु गेल्या दोन वर्षात त्याकडे दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कचरा साठला आहे. येणाऱ्या काळात योग्य रीतीने घनकचरा संकलन होऊन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी यासाठी प्रयत्न असणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.
स्वच्छता पंधरवाडा
नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहादेकर जनतेसोबत स्वच्छता पंधरवाडा हा उपक्रम राबवून शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आमच्या प्रयत्ना राहणार असून सर्व शहरवासीयांनी घनकचरा कचरा संकलन करणाऱ्या गाडीतच टाकावा.रस्त्यावर टाकू नये ,गटारींमध्ये कचरा फेकू नये त्यामुळे आपल्याच आरोग्याला धोका होईल असे कृत्य कोणीही करू नये. असे आवाहन करून लवकरच एक चांगलं स्वच्छ शहर सर्व शहादेकर नागरिकांनी व नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांनी एकत्रित येऊन निर्माण करू. यात आमदार राजेश पाडवी यांचेही मार्गदर्शन घेऊ. असेही श्री. पाटील यांनी सांगितले








