नंदुरबार l प्रतिनिधी
एस. ए. मिशन हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रणव गावित याने चीन येथे आयोजित आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेत यशस्वी सहभाग घेऊन एस.ए.मिशन हायस्कूलचा सहित संपूर्ण जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचाही मान वाढवला आहे. त्याच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे विद्यालयात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचे आज महाविद्यालयात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
प्रणवच्या परत येण्याने विद्यालय परिसर पूर्णपणे उत्साहाने भारलेला होता. विद्यालयाचे आवार रंगीबेरंगी रांगोळ्यांनी आणि अभिनंदनाचे बोर्ड व बॅनर लावून सजवले होते. या यशाच्या निमित्ताने सर्वांना मिठाई वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.
स्वागत सोहळ्यामध्ये विद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, संस्थेचे चेअरमन मारथा आक्का सुतार, व्हाईस चेअरमन हर्षानंद कालू, शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी, उपप्राचार्य विजय पवार, पर्यवेक्षिका वदंना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनल वाळवी, सी.पी. बोरसे तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रणवसाठी रेव्ह.अनुप वळवी यांनी प्रार्थना केली. संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी यांनी आपल्या भाषणात प्रणवच्या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले, “आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर प्रणवचा सहभाग हा फक्त विद्यालयासाठीच नाही, तर नंदुरबार जिल्ह्यासाठीही अभिमानास्पद आहे. त्याची ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
प्रणवच्या या यशामुळे एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव राज्यातच नव्हे, तर देशभरात पोहोचले आहे. एस. ए. एम. ट्रस्ट आणि विद्यालयाला त्याच्या या यशाचा अभिमान असून, त्याच्या या कामगिरीची नोंद विद्यालयाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी केली जाईल, असे सर्व शिक्षक आणि पालकांनी सांगितले. प्रणवला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रशिक्षक खुशाल शर्मा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की खेळाडूंची अशीच कामगिरी सतत सुरू राहील आणि लवकरच शाळेत रग्बी आणि हॉकीचे ग्राउंड तयार करून भविष्यात शाळेतील विद्यार्थ्यांना हॉकी, रग्बी आणि मैदानी खेळांचा भारतीय संघामध्ये बघु.