नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्याचे शिल्पकार महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात विविध क्षेत्रातील नामवंतांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर हजारो कार्यकर्त्यांची रीघ लागलेली दिसली. दरम्यान सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित राहून राज्याचे क्रीडा मंत्री तथा पालकमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी डॉक्टर गावित यांची गळाभेट घेऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. राजकीय पार्श्वभूमीवर हा प्रसंग उपस्थितांचा उत्साह द्विगुणित करणारा ठरला.
15 ऑगस्ट 2025 रोजी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार शहरातील बाबा रिसॉर्ट सभागृहात भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात शुभेच्छा देणाऱ्यांनी सकाळपासूनच रीघ लावली होती. मुंबई पुणे नासिक जळगाव धुळे नंदुरबार तसेच सुरत अशा विविध जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर रात्री उशिरापर्यंत डॉक्टर विजयकुमार गावित यांना शुभेच्छा देण्यासाठी येत होते.
हजारोच्या संख्येने येणाऱ्या चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारताना डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या समवेत व्यासपीठावर त्यांच्या पत्नी तथा नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य डॉक्टर कुमुदिनी गावित, कन्या संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित उपस्थित होते. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला क्रीडा व संस्कृती, बांधकाम यासह निरनिराळ्या क्षेत्रातील संबंधित संस्थाचालक, संघटना, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य विविध गावांमधील सरपंच उपसरपंच सदस्य तसेच शेतकरी व्यापारी आणि उद्योजक या सर्वांचा समावेश होता. ‘आपले साहेब’ असे शब्द लिहिलेले मोठे कट आउटस, विकास कामांच्या डॉक्युमेंटरी दाखवणाऱ्या एलईडी स्क्रीन आणि त्यापुढे उभे राहून सेल्फी काढणारे कार्यकर्त्यांचे जत्थे जल्लोष आणि उल्हास यात विशेष भर घालताना दिसले. माजी आमदार शरद गावित, माजी आमदार शिरीष दादा चौधरी, भाजपाचे युवा नेते डॉक्टर विक्रांत मोरे, माजी नगरसेवक आनंदा माळी लक्ष्मण माळी अविनाश माळी केतन रघुवंशी चिंटू रघुवंशी गौरव चौधरी प्रशांत चौधरी, सुभाष पान पाटील सुभाष आप्पा पावरा, विनोद वानखेडे, यांच्यासह शिरपूर साक्री धुळे, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, मोलगी येथील प्रत्येकाच्या नेतृत्वात शेकडो जणांच्या गटाने येऊन डॉक्टर गावित यांचा भव्य पुष्पहाराने केलेला घवघवीत सत्कार सोहळ्याची शान वाढवणारा ठरला. संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष जे एन पाटील आणि विजय क्रीडा गौरव समितीचे प्रमुख ईश्वर धामणे यांनी केले.
पालक मंत्र्यांनी घेतली गळाभेट
राज्याचे क्रीडामंत्री तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री एडवोकेट माणिकराव कोकाटे यांनी बाबा रिसॉर्ट सभागृहात सोहळ्याप्रसंगी स्वतः उपस्थित राहून आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची भेट घेत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजीत दादा मोरे, युवकचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंचावर येताच आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची गळाभेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा देतो शिवाजी सावंत लिखित प्रसिद्ध ‘छावा’ कादंबरी भेट दिली.
डॉक्टर गावित यांची पेढे तुला
केसर पाडा येथील भोलूभाई आणि अन्य चाहते यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांची पेढे तुला करून सर्व उपस्थितांना पेढे वाटप केले. डॉक्टर विजयकुमार गावित यांना एका पारड्यात बसवून त्यांच्या वजना इतके पेढे दुसऱ्या पारड्यात ठेवण्यात आले होते.