नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याचे लाडके नेते, नंदुरबार जिल्हा निर्मितीचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो क्रीडा स्पर्धांचा नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिना गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावीत यांच्या हस्ते आज शानदार शुभारंभ करण्यात आला.
दिनांक 11 ऑगस्ट 2025 पासून सलग चार दिवस विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा निर्मितीनंतरच्या 26 वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेण्यात आल्या असून विजेत्यांना मोठ्या प्रमाणात पारितोषिके देण्यात येणार आहेत. विविध क्रीडा प्रकारातील या स्पर्धांमध्ये विजयी होणाऱ्या 155 खेळाडूंना ट्राफी, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सहभागी होणाऱ्या 1000 हून अधिक क्रीडापटूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी निबंध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. हा क्रीडा महोत्सव नंदुरबारमधील युवकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
दरम्यान, का नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिना गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावीत यांच्या हस्ते जिल्हा स्तरीय कॅरम बोर्ड रोप स्किपिंग स्पर्धा 2025 चा शुभारंभ करून विजय गौरव क्रीडा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
श्रीमती डी.आर. हायस्कूल,जिमखाना नंदुरबार येथे 19 वर्षावरील तसेच वरिष्ठ नागरिक या दोन गटात आज कॅरम बोर्ड स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमती डी.आर. हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक तसेच नंदुरबार लोकसभेच्या खासदार संसदरत्न हिना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील,जितेंद्र पाटील, छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त बळवंत निकुम, ईश्वर धामणे तसेच डॉ.काणे प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सुलभा महिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्यातून 97 कॅरम स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कॅरम खेळाचे पंच म्हणून दिनेश बैसाणे,जगदीश बच्छाव, विशाल मच्छले यांनी परिश्रम घेतले.
याचबरोबर नंदुरबार शहरातील तैलिक मंगल कार्यालयाच्या सभागृहात रोप स्किपिंग स्पर्धा म्हणजे “विजय गौरव दोरीउडी स्पर्धा”चेही उद्घाटन माजी खासदार डॉ. हिना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या हस्ते पार पडले. त्याप्रसंगी नंदुरबार तालुका अध्यक्ष (भाजपा) दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील, माजी नंदुरबार तालुका अध्यक्ष (भाजपा) जितेंद्र पाटील, प्रा. डॉ. ईश्वर धामणे, शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते बळवंत निकुंभ, हिवाळे सर तसेच विविध शाळांतील क्रीडा शिक्षक पूनम शर्मा, तुषार सोनवणे, किरण इंगळे, श्रीकृष्ण पाटील, अशोक वसावे, नकुल चौधरी, विशाल सोनवणे, अनमोल पाडवी आणि असंख्य पालक उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांनी एका मागून एक सादर केलेल्या दोरी उड्यांच्या कौशल्यपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित विद्यार्थी आणि नागरिक एकच जल्लोष करताना दिसले. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांनी भाषणातून सांगितले की, राजकीय आणि सामाजिक कार्य करण्याबरोबरच कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणे आवश्यक असते म्हणूनच दरवर्षी अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. आपल्या जीवनातील मानसिक व शारीरिक सुदृढता कला आणि क्रीडा कौशल्यामुळे वाढत असते म्हणून प्रत्येकाने खेळात सहभागी झाले पाहिजे त्याचबरोबर कलागुण सुद्धा जोपासले पाहिजे. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांनी विजय क्रीडा महोत्सव समितीचे कार्य आणि नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आ. डॉ. विजयकुमार गावीत यांच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानाबद्दल प्रशंसनीय शब्दात मनोगत व्यक्त केले. भाषणातून खेळाचे महत्व विशद करून विद्यार्थ्यांना आवाहन केले की, जिंकणे आणि हारणे याला महत्व न देता आपल्यातील कौशल्य वाढवण्यासाठी या स्पर्धांकडे पाहिले पाहिजे.
स्पर्धेतील सिनियर गटात अनेक पालकांनी उत्साहात सहभाग घेतला. दिपेश गायकवाड, कुणाल चौधरी, सचिन गोंधळी, शरीफ शेख, मोहित मोरे, चंद्रकांत पाटील, सचिन सोनवणे, राज अहिरे, दिव्येश बाबर, आर्यन अहिरे, रोहित अहिरे, गणेश गवळी, समर गुरव यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतली. सूत्रसंचालन तुषार सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय पटेल यांनी व्यक्त केले.
पुढील स्पर्धा याप्रमाणे
१२ ऑगस्टला बुद्धिबळ स्पर्धा १२, १४ आणि १९ वर्षांआतील वयोगटासाठी होतील. खेळाडूंचा स्वतंत्र गट आणि आंतराष्ट्रीय मानांकनप्राप्त रेटेड खेळाडूंसह १९ वर्षांवरील खेळाडूंचा दुसरा गट अशा चार गटांत स्पर्धक भाग घेऊ शकतात. १२ आणि १३ ऑगस्टला धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील संघांसाठी व्हॉलिबॉल स्पर्धा होईल. १७ वयोगटाच्या आतील खेळाडूंसाठी पासिंग आणि १९ वर्षांवरील खेळाडूंसाठी शूटिंग स्पर्धा राहील. १४ ऑगस्टला सकाळी सातला मॅरेथॉन स्पर्धा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी होईल. १८ वर्षांवरील गटासाठी म्हणजे खुल्या गटासाठी ही स्पर्धा राहील.