शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक पूर्व बैठकांचे सत्र,आ.चंद्रकांत रघुवंशींचे गटनिहाय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
नंदुरबार l प्रतिनिधी
आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने कंबर कसली असून, उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार कार्यालयात दररोज बैठकांचे सत्र सुरू आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका आगामी कालावधीत होऊ घातलेल्या आहेत. निवडणुक प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणा देखील सज्ज असून, निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो. त्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाने कंबर कसलेली आहे. अनेक जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांची चाचपणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. आठवडाभरापासून शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी व जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या उपस्थितीत दररोज बैठकांचे सत्र सुरू आहे.
नंदुरबार तालुक्यातील धानोरा, कोठली,नांदरखेडा, आष्टा,कोळदा,खोंडामळी,कोपर्ली,रनाळे,शनिमांडळ, पातोंडा गट आणि त्या अंतर्गत असलेल्या गणांची बैठक घेण्यात आली. या गटांमध्ये इच्छुकांचे संख्या अधिकची दिसून येत आहे. नेत्यांकडून कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. यावेळी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील,माजी जि.प अध्यक्ष वकील पाटील,माजी सभापती विक्रमसिंह वळवी,माजी जि.प सदस्य देवमन पवार,बाजार समिती चेअरमन दीपक मराठे,शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.