शाळेत क्रीडा गणवेशाची सक्ती करू नये शिक्षणाधिकारी कार्यालयाचा शाळेंना आदेश,हिंदु सेवा सहाय्य समितीचा लढ्याला यश
नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात बहुतांश शाळा शासनाच्या अध्यादेश नसतांना शनिवारी क्रीडा गणवेशचा नावाने विद्यार्थ्यांसाठी पालकांना क्रीडा गणवेश घेण्याची सक्ती करून त्यातून पालकांची आर्थिक लूट करीत आहे. यातून होणारी पालकांची लूट थांबवून त्या शैक्षणिक संस्थांची चौकशीची मागणी हिंदु सेवा सहाय्य समिती मार्फत दि १८ जुलै रोजी जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत शिक्षणाधिकारी कार्यालय यांनी शाळांना पत्र पाठवून शाळेत क्रीडा गणवेश व दुकानासंदर्भात सक्ती करू नये असे आढळल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल अशी ताकीद दिली आहे. हिंदु सेवा सहाय्य समितीने दिलेल्या लढ्याला यश मिळाले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील यांनी दिली.
दर शनिवारी आनंददायी शनिवार किंवा योगासने करण्यासाठी शाळेत क्रीडा गणवेशचा (स्पोर्ट्स ड्रेसचा) नावाने विशिष्ट दुकानातून ड्रेस खरेदी करण्यास विद्यार्थ्यांना सांगितले जाते. हा शालेय क्रीडा गणवेश (स्पोर्ट्स ड्रेस) ६०० ते ७०० रुपये पर्यंत मिळत आहे. वास्तविक पाहता या गणवेशाची गुणवत्ता बघता हा फक्त ३०० ते ३५० रुपये किमतीचा असेल परंतु शाळेच्या सिम्बॉल लावून त्याची दुपट किमतीने विक्री केली जात आहे. क्रीडा गणवेश घेणे संदर्भात शासनाच्या अध्यादेश नसतांना शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना असे गणवेश घेण्याची सक्ती कशी करू शकतात?
जिल्ह्यातील हजारो पालकांनी आतापर्यंत हे गणवेश खरेदी केले तोपर्यंत शिक्षण विभागाला कसे कळले नाही? या सर्व प्रकारामध्ये शाळेचे संस्था चालक, शाळेचे कर्मचारी यांचीही मिलीभगत असते का? शिक्षण विभागाला माहिती असूनही ते याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या पालकांचे शाळेचा छुप्या शुल्कापोटी तर कधी गणवेश, स्पोर्ट्स ड्रेस, शालेय साहित्य पोटी हजारो रुपयांचे ओझे त्यांच्यावर येत आहे.
ज्या शाळांनी शासन आदेश नसतांना विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश घेणे अनिवार्य केले आहे त्या शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य यांचावर कारवाईचे आदेश द्यावे अशी मागणी हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील पत्रकार परिषदेत केली यावेळी पत्रकार परिषदेला अधिवक्ता अनिल लोढा उपस्थित होते.