नंदुरबार l प्रतिनिधी
लोकशाही मूल्यांची रुजवण शालेय वयातच व्हावी या हेतूने नंदुरबार तालुक्यातील कोळदे गावातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित अनुदानित माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रमशाळेत अनोखा उपक्रम राबविण्यात आला. आधुनिक काळात ईव्हीएम यंत्राद्वारे मतदान होणाऱ्या वातावरणात या शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक बॅलेट पेपरवर मतदान करून शालेय प्रतिनिधींची निवड केली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसोबत शिक्षकवर्ग आणि प्राचार्य यांचे उदंड सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीचा मूलभूत आदर्श रुजविण्याच्या उद्देशाने करण्यात आली. संपूर्ण मतदान प्रक्रिया ही आदर्श पद्धतीने, म्हणजेच मतपत्रिका आणि मतदान पेटी वापरून राबविण्यात आली. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रतिनिधींची निवड करण्यात आली. त्यानंतर विद्यालय प्रमुख प्रतिनिधीची निवड करण्यात आली. या सर्व पदांसाठी विद्यार्थ्यांनी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले होते. निवडणुकीपूर्वी प्रचार देखील विद्यार्थ्यांनीच केला.
मतदान प्रक्रियेतील सर्व विद्यार्थ्यांनी अगदी शिस्तबद्ध रांगेत उभे राहत बॅलेट पेपरवर आपला गुप्त मतदानाचा हक्क बजावला. निवडून आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्यांविषयी शपथ घेतली आणि शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागाचे आश्वासन दिले. यामुळे नेतृत्वगुणांची आणि जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये अधिक ठसविण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी व मुख्याध्यापक ईश्वर चौधरी यांनी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची पायाभरणी शालेय वयात झाल्यास भविष्यात जबाबदार नागरिक घडतील, असे प्रतिपादन केले.
या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राध्यापक हेमराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व प्रा. शुभम परदेशी,प्रा.संदिप पाटील,प्रा.भूषण शिंदे, सुरेंद्र पवार,प्रा.ललित माळी, प्रा.स्वप्निल सामुद्रेप्रा,पंडित कोकणी इतर शिक्षकवर्ग यांनी संयोजन आणि मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या प्रयोगात्मक लोकशाही सहभागामुळे संपूर्ण शाळेत उत्साहाचे वातावरण होते.