नंदुरबार l प्रतिनिधी-
कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीची ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी ) साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या अनुषंगाने नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अप्पर जिल्हादंडाधिकारी सुधीर खांदे केले आहे.
यावर्षी 19 ऑक्टोबर किंवा 20 ऑक्टोंबर 2021 रोजी ( चंद्रदर्शनावर अवलंबून ) ईद-ए-मिलाद साजरी करण्यात येणार असून कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे मोठया संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहे. त्यामुळे ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी ) शक्यतोवर घरात राहूनच साजरी करावी. तथापि, मिरवणुका काढावयाच्या असल्यास पोलीस प्रशानाच्या पूर्वी परवानगीनेच एका मिरवणूकीत जास्तीत जास्त 5 ट्रक आणि एका ट्रकवर जास्तीत जास्त 5 इसमास परवानगी राहील. मिरवणूकादरम्यान मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल.
मिरवणूकीत सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था केल्यास ध्वनीप्रदुषण नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. मिरवणूकीच्या दरम्यान मिरवणूकीच्या स्वागतासाठी पंडाल बांधावयाचे असल्यास शासनाच्या नियमानूसार संबंधित नगरपालिका, पोलीस व स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. सदर पंडालमध्ये एकावेळी किती उपस्थिती असावी याबाबत स्थानिक प्रशासनाने ठरविलेल्या विहित नियमांचे पालन करावे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 24 सप्टेंबर 2021 रोजीच्या आदेशातील नियमांचे काटेकोर पालन करुन मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखुन धार्मिक प्रवचन करण्यास परवानगी देण्यात येत आहे. प्रवचनाचे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयेाजित करण्यात यावेत. केबल, टि.व्ही,फेसबुक इत्यादी माध्यामातून थेट प्रेक्षपणाद्वारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी.
सबील, ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी ) निमित्त मिरवणूकीच्या रस्त्यावर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ पाण्याचे तात्पुरते सबील ( पाणपोई ) लावण्यात येतात. सबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी, त्याठिकाणी 5 पेक्षा जासत व्यक्तींनी उपस्थित राहू नये, याठिकाणी सिलबंद पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्यात यावे,सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सामाजिक अंतराचे पालन करावे.
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सद्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील, त्यामध्ये कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही. कोविड-19 परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे असे उपक्रम राबण्यिात यावेत, व या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. वरील सूचनाव्यतिरिक्त स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार संबंधित नगरपालिका, पोलीस व स्थानिक प्रशसनाला असतील.
कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन आरोग्य पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगर पालिका, नगर पंचायत,पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. सदर परिपत्रक नंदुरबार जिल्ह्याच्या सिमा क्षेत्राकरीता लागू राहील कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 , साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.