नंदुरबार l प्रतिनिधी-
अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलुम संस्था येथे 9 वर्षापासून अवैधपणे येमेन येथील दाम्पत्य वास्तव्य करीत असल्याची घटना उघड झाली आहे. विशेष म्हणजे त्यांना झालेल्या मुलीची अक्कलकुवा ग्रामपंचायत मध्ये नोंद करण्यात आली आहे.याप्रकरणी येमेन नागरिक तसेच जामिया इस्लामिया इशातुल उलुम संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्या आहेत.
नंदुरबार जिल्हयातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलुम संस्था येथे काही येमेन नागरिक अवैधपणे वास्तव्यास असल्याचे जिल्हा विशेष शाखेचे निदर्शनास आले. खालेद इब्राहीम सालेह अल-खदामी, रा. अरेबीयन रोड जवळ, मसबाह, साना हा येमेन देशाचा नागरिक असुन तो नवापूर येथील जावीद मांडा यांच्या जस फूड इंडस्ट्रीज, अल्सीफा हॉस्पीटल जवळ या नावाने असलेल्या फूड इंडस्ट्रीज या कंपनीशी व्यापार करण्यासाठी बिजनेस व्हिसा घेऊन भारतात आला होता. त्याच्या सोबत त्याची पत्नी खादेगा इब्राहीम कासीम अल-नाशेरी असे परिवारासह मुलाचे औषधोपचारासाठी मेडीकल व्हिसा घेऊन दि.22 नोव्हेंबर 2015 रोजी अक्कलकुवा मधील अस्सलाम हॉस्पिटल, मोलगी रोड, अक्कलकुवा येथे त्यांच्या मुलाचे वैदयकीय औषधोपचारासाठी आले होते.
खालेद इब्राहीम सालेह अल-खदामी याच्या व्हिसाची मुदत ही दि. 6 नोव्हेंबर 2015 व त्याचे परिवाराचे व्हिसाची मुदत दि. 19 फेब्रुवारी 2016 रोजी पर्यंत वैध होती. परंतु सदर येमेन कुटूंब हे त्यानंतरदेखील अस्सलाम हॉस्पिटल, मोलगी रोड, अक्कलकुवा येथील हॉस्पीटलमध्ये आंतररुग्ण म्हणून न राहता ते जामिया इस्लामिया इशातुल उलुम, अक्कलकुवा येथील संस्थापक व स्टाफचे मदतीने सर्वसाधारण नागरिकांचे रहिवासी क्वार्टर्स येथे अवैधपणे राहत असल्याचे निदर्शनास आले.
त्याचप्रमाणे खालेद इब्राहीम सालेह अल-खदामी हा त्याचे व्हिसाची मुदत संपली हे माहित असतांना देखील दि. 4 जानेवारी 2016 रोजी मदरसा कुव्वतुल इस्लाम काटोल, भैसदेही, जिल्हा- बैतुल मध्यप्रदेश येथील वार्षिक समारंभाचे कार्यक्रमास सहभागी होणसाठी गेला होता, सदर बाब भैंसदेही पोलीस ठाणे, जिल्हा बैतुल (मध्यप्रदेश) यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी या इसमावर परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14 A अन्वये गुन्हा दाखल करुन त्यामध्ये त्याला अटक केली होती. सदरचे गुन्हयात उच्च न्यायालय, जबलपुर खंडपीठ यांनी त्याची जामिनावर मुक्तता करुन त्यास व्हिजाची मुदतवाढ मिळेपर्यंत त्याने येमेन कॉन्सुलेट येथे वास्तव्य करण्याबाबत आदेशित केले होते.
परंतू खालेद इब्राहीम सालेह अल-खदामी हा येमेन कॉन्सुलेट येथे वास्तव्य न करता तो पुन्हा कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी नसतांना अवैधपणे न्यायालयाचे अटी व शर्तीचे उल्लंघन करुन परिवारासह जामिया इस्लामिया इशातुल उलुम, अक्कलकुवा मधील अस सलाम हॉस्पीटल, मोलगी रोड, अक्कलकुवा मध्ये आंतररुग्ण असल्याचे वेळोवेळी भासवून सर्वसाधारण रहिवासी क्वार्टर्स येथे आज पर्यंत वास्तव्य करीत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान त्यास न्यायालयाने, भैसदेही यांनी 3 वर्षे सश्रम कारावासाची व 1 हजार रु द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यावर सदर इसमाने अपर सत्र न्यायालय, भैसदेही येथे अपिल दाखल करुन सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे.
येमेन कुटूंबियाचे अक्कलकुवा येथे वास्तव्य असतांना खालेद इब्राहीम सालेह अल-खदामी यांच्याकडे दोन मुलींचा जन्म झाला. त्यापैकी एका मुलीची ग्रामपंचायत अक्कलकुवा येथे जन्माची नोंद असून जन्म प्रमाणपत्रात आई वडीलांचा कायमचा पत्ता हा जामीया क्वार्टर्स, अक्कलकुवा असे नमुद आहे. तसेच सदर इसमाचे दोन्ही मुलींचा पासपोर्ट देखील तयार करुन घेण्यात आला होता. तसेच मुलीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्रावर भारतीय नागरिकत्व नमुद केलेले असल्याचे निदर्शनास आले असून सदर कुटूंबाने त्यांच्याकडे कोणताही वैध व्हिसा नसतांना महत्वाचे दस्तऐवज हे जामिया इस्लामिया इशातुल उलुम संस्था यांचे मदतीने तयार करुन घेतले आहेत.
त्याचप्रमाणे खालेद इब्राहीम सालेह अल-खदामी व त्याची पत्नी खादेगा इब्राहिम कासीम अल नाशेरी यांनी त्यांच्या कडील व्होडाफोन कंपनीचे मोबाईल सिम हे शेख अबरारूल हक शेख निसार, रा. जामीयानगर, अक्कलकुवा यांच्या नावाने विकत घेवुन ते कंपनीची फसवणूक करुन वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
तरी सदर येमेन देशाचे नागरिक खालेद इब्राहीम सालेह अल-खदामी, त्याची पत्नी खादेगा इब्राहिम कासिम अल-नाशेरी, दोन्ही रा. अरेबीयन रोड जवळ, मसबाह, साना (येमेन) यांना जामिया इस्लामिया इशातुल उलुम संस्था, अक्कलकुवा चे संस्थापक गुलाम मोहम्मद रंधेरा (वस्तानवी) तसेच अध्यक्ष हुजेफा मोहम्मद रंधेरा (वस्तानवी) व संस्थेचे इतर स्टाफ अशांविरुध्द अक्कलकुवा पोलीस ठाणे भा. न्या. संहिता 2023 चे कलम 318(3), 318(4), 197 (1) (D) सह परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14(a), 14-C सह टेलिग्राफ कायदा कलम 4, 7/20 A प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड करीत आहेत.