नंदुरबार ! प्रतिनिधी
वीज मीटर फॉल्टी दाखवून ग्राहकाला बेकायदेशीरपणे चुकीचे वीजबिल दिल्या प्रकरणी नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने वीज वितरण कंपनीला चांगलाच शॉक दिला आहे. वीज ग्राहकाला देण्यात आलेले वादग्रस्त बिले रद्द करून 45 दिवसाच्या आत नवीन मीटर बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच मानसिक व शारीरिक त्रासापोटी दहा हजार रुपये आणि खर्च पाच हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश ग्राहक निवारण आयोगाने दिला आहे.
या प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, नवापूर तालुक्यातील नवागाव येथील दिलीप आत्माराम पवार यांनी घरासाठी 1978 पासून वीज वितरण कंपनीकडून कनेक्शन घेतले आहे. तेव्हापासून ते वेळोवेळी वीज बिलांचा भरणा नियमित करीत आले आहेत. दरम्यान सन 2017 मध्ये वीज वितरण कंपनीने त्यांचे वीज मीटर फॉल्टी दाखवून सुमारे 1 लाख 64 हजार 560 रुपयांचे चुकीचे विजबिल पाठवले होते. याबाबत दिलीप पवार यांनी नवापूर येथील ग्रामीण विभागाचे सहाय्यक अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार करून न्यायाची अपेक्षा केली होती. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. शिवाय कोणतीही पूर्वसूचना न देता घराचे वीज बंद करून मीटर जप्त केले होते. याबाबत तक्रारदार पवार यांनी अडव्हॉकेट धनराज गवळी यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक निवारण आयोगाकडे अर्ज दाखल केला होता. त्यावर दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. अडव्हॉकेट धनराज गवळी यांनी प्रत्यक्ष वापर झालेले युनिट आणि वीज कंपनीने पाठवलेले चुकीचे वीज बिल यासंबंधीचे बारकाईचे मुद्दे ग्राहक आयोगाच्या लक्षात आणून दिले. तसेच तक्रारदाराचा वीज पुरवठा खंडित असल्याने दैनंदिन आवश्यक गरजांपासून वंचित राहावे लागले आहे. शारीरिक मानसिक व आर्थिक नुकसान झाल्याचा निष्कर्ष काढत ग्राहक आयोगाने आपला निकाल दिला आहे. वीज कंपनीने दिलेले वादग्रस्त देयके रद्द करून 45 दिवसाच्या आत तक्रारदार यांच्या घरी विनामोबदला नवीन वीज मीटर बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये आणि खर्चापोटी पाच हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये तक्रारदाराला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे ग्राहकांशी मनमानी करून अवाजवी विजबिल आकारणाऱ्या वीज कंपनीला चांगला झटका बसला आहे. या खटल्याचे कामकाज जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष संजय बोरवल, सदस्य श्रीमती बी .पी. केतकर, एम. एस . बोडस यांच्या न्यायालयात चालले. तक्रारदारातर्फे एडवोकेट धनराज गवळी यांनी काम पाहिले. त्यांना ऍड. हितेंद्र राजपूत व शुभांगी चौधरी यांनी सहकार्य केले.