नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फॉर्मर युनिक आयडी नोंदणीसाठी जिल्ह्यात कामाला 16 डिसेंबर पासून होणार असून यासाठी क्षेत्रीय स्तरावरील काम करणारे ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्राम विकास अधिकारी यांना शेतकरी बांधवांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, यांनी केले आहे.
कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडीचा उपयोग होणार असून यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तरच त्यांना फार्मर आयडी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सेवा, सुविधा त्यातून मिळू शकतील. याद्वारे शेतकऱ्यांसाठी अॅग्रीस्टॅक नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे.
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार अॅग्रीस्टॅक योजनेस मान्यता देण्यात आली असुन या योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांचा शेतांचा आधार संलग्न माहिती संच (शेतकरी नोंदणी) तयार करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी ग्रामस्तरावर 16 डिसेंबर 2024 पासून मोहीम सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्याच्या फार्मर युनिक आयडी नोंदणीसाठी नंदुरबार जिल्ह्यात कामाला सुरुवात झाली आहे.
यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे 06 गावांची निवड करण्यात करण्यात आली असून या ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक शेतकऱ्यांच्या फार्मर युनिक आयडीच्या नोंदी घेणार आहेत. यासाठी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच तालुका पातळीवरील प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नोंदणीला सुरुवात होणार आहे.
शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (शेतकरी नोंदणी) तयार झाल्यानंतर शेतकऱ्याला विविध योजनेचा लाभ, पिक विमा, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाई तसेच शेतकऱ्यांनी कृषी कर्ज व इतर सेवा देण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी व शेतकऱ्यांची ओळख पटवून देण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करण्यात आली आहे.
गावात प्रत्यक्षात नोंदणीचे काम करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक नियुक्त करण्यात आले असुन जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अमंलबजावणी समिती नियुक्त करण्यात आली असून यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी, जिल्हा लिड बँक मॅनेजर यांचा समावेश आहे.
तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती असुन यामध्ये तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. असेही जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.