नंदुरबार l प्रतिनिधी-
मागील अनेक वर्षात वैयक्तिक लाभाच्या असो की गाव विकासाच्या योजना असो एकमेव गावित परिवारानेच विविध योजना आणून विकासाचे काम करून दाखवले आहे. तरीही विरोधक खोटा प्रचार करत असतात. तुमच्या घरासाठी आणि तुमच्या गावासाठी कोणामुळे काय मिळाले याचा प्रत्येकाने आवर्जून विचार केला पाहिजे, असे सांगतानाच महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आरक्षण संपणार नाही आणि शेवटपर्यंत प्रत्येकाला लाभ मिळत राहतील म्हणून आरक्षणासंदर्भातील खोट्या प्रचाराला बळी पडू नका; असे आवाहन केले.
नंदुरबार तालुक्यातील कोळदे येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम करण्यात आले. त्या इमारतीचे उद्घाटन दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या व मा.खा. डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
राज्य आणि केंद्र सरकारच्या जास्तीत जास्त योजना आणून आम्ही प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले. कोळदे ग्रामपंचायतच्या या इमारतीच्या बांधकामासाठी सुद्धा डॉक्टर हिना गावित यांनी केंद्रीय योजनेतून सुमारे वीस लाख रुपयांचा निधी मिळवून दिला आहे. या गावात मोठे सभागृह उभारले जावे यासाठी सुद्धा प्रयत्न चालू असून समाज मंदिर उभारणीच्या तांत्रिक अडचणी सुटल्या असल्यामुळे लवकरच भव्य समाज मंदिर येथे उभे राहील. मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागाचा निधी मिळवून दिल्याने आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गाव रस्त्यांचे प्रश्न सोडवले आहेत पेव्हर ब्लॉक, कॉंक्रिटीकरण कामांनाही लवकरच चालना देऊ असे डॉक्टर सुप्रिया गावित पुढे म्हणाल्या.
या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष जे एन पाटील, लोकनियुक्त सरपंच मोहिनी ताई वळवी, उपसरपंच आनंद गावित, सदस्य ज्ञानेश्वर राजपूत, येड्या नाईक, श्वेता गवळे व अन्य उपस्थित होते.