नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यातील पोलिस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून बदल्यांचे आदेश पोलिस अधिक्षक श्रवण दत्त एस यांनी काढले आहेत. यातून रिक्त असलेल्या पोलिस ठाण्यांना नियमित पोलिस निरीक्षक मिळाले आहेत.
या आदेशानुसार नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचा भार पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांना दिला गेला आहे.शहादा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांची नवापूर पोलिस ठाण्यात झाली आहे. नियंत्रण कक्षाचे दुसरे पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्यावर तालुका पोलिस ठाण्याची जबाबदारी असणार आहे. अक्कलकुवा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील रुजू होणार आहेत. तळोदा पोलिस ठाण्याचे पोलिस
निरीक्षक राजेंद्र जगताप हे धडगाव पोलिस ठाण्याचा पदभार घेतील. धडगावचे इशामोद्दीन पठाण हे नियंत्रण कक्षात कार्यरत राहतील. नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.
म्हसावदचे सहायक पोलिस निरीक्षक राजन मोरे हे शहादा पोलिस ठाणे, शहाद्याचे सहायक निरीक्षक गणेश वारुळे हे म्हसावद, अक्कलकुवा येथील सहायक निरीक्षक राजू लोखंडे हे तळोदा पोलिस ठाणे, सहायक निरीक्षक संदीप आराक सारंगखेडा, नवापूर सहायक निरीक्षक नरेंद्र साबळे हे विसरवाडी तर नियंत्रण कक्षाचे सहायक पोलिस निरीक्षक धर्मराज पटले यांची जिल्हा विशेष शाखेत पदभार स्विकारणार आहेत.