नंदुरबार l प्रतिनिधी-
आदिवासींची संस्कृती जपायचं काम हे आपल्या प्रत्येक आदिवासी समाज बांधवांचं आहे. आपण आदिवासी आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, असे सांगतानाच भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित म्हणाल्या, मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे संपूर्ण राजकारण आदिवासी विकास साधण्यासाठी तितकेच आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी वाहिलेले असून त्यांनी कायमच आदिवासी हक्क आणि आदिवासी संस्कृती रक्षणाच्या हिताचे निर्णय केले त्याचबरोबर आदिवासी विकासार्थ सर्वतोपरी कार्य केले. जल्लोष जागतिक आदिवासी दिवस 2024 च्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
जल्लोष जागतिक आदिवासी दिवस 2024 या तीन दिवसीय सोहळ्याचे आयोजन आदिवासी विकास विभागाच्या वतीने करण्यात आले असून नंदुरबार येथील शिवाजी नाट्य मंदिरात आज त्याचे अत्यंत जल्लोषात उद्घाटन पार पडले.
याप्रसंगी जल्लोष जागतिक आदिवासी दिवस सोहळ्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी रिमोटद्वारे डिजिटल उद्घाटन केले. तत्पूर्वी सर्व प्रमुख मान्यवरांनी आदिवासींची देवता देवमोगरा माता आणि आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमांचे पूजन केले. राष्ट्रीय प्रवक्ता संसद रत्न डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. कुमुदिनीताई गावित, जिल्हा परिषद सदस्य अर्चना गावित, जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावित, नंदुरबार प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, तळोदा प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी नितिषा माथूर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी निखिल माळी, प्रशासकीय अधिकारी काकडे अन्य सर्व कर्मचारी अधिकारी आणि सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
*डॉक्टर हिना गावित यांचे उदबोधक भाषण*
नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि पारंपारिक आदिवासी खाद्यपदार्थांचे स्टॉल यांचा आजच्या कार्यक्रमात समावेश होता. एकात्मिक आदिवासी प्रकल्प अंतर्गत कार्यरत शाळांमधील विविध ठिकाणाहून आलेल्या 15 शालेय पथकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. शिवाजी वाघमारे, नृत्य दिग्दर्शक क्षमा वासे, लेखक दिग्दर्शक प्रेम इंगळे यांनी काम पाहिले.
याप्रसंगी भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी प्रमुख मार्गदर्शन पर भाषण करताना सांगितले की, आपली आदिवासी कला- संस्कृती अतिशय वेगळी आहे त्याचं वेगळेपण आजपर्यंत आपण जपत आलेलो आहोत. ती जपली तरच आपली आदिवासी संस्कृती ही टिकेल रुजेल आणि वाढणार आहे. आपली जी संस्कृती आहे यावरून आपली ओळख होते पण दुर्दैवानं असं बघतात मागच्या काळामध्ये आपल्या आदिवासींची संस्कृती कुठेतरी हळूहळू नष्ट होत चालली आहे आणि मला असं वाटतं आपल्या आदिवासींची संस्कृती जपायचं काम हे आपल्या प्रत्येक आदिवासी समाज बांधवाचं आहे. भले मराठी बोला हिंदी बोला इंग्लिश बोला जर्मन फ्रेंच इटालियन स्पॅनिश जी भाषा बोलायची बोला, पण सगळ्यात पहिले आपली आदिवासी भाषा ही आपली ओळख आहे आणि ती विसरू नका! आदिवासींची संस्कृती जपण्यासाठी ढोलचा सुद्धा आपण उपयोग लग्नांमध्ये जसं पूर्वीच्या काळात केला जात होता तसं करणं खूप गरजेचे आहे आपण जर आपल्या या छोट्या छोट्या संस्कृतीतल्या छोट्या छोट्या आपल्या ज्या गोष्टी आहेत या जर आपण जोपासल्या नाही तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आदिवासींचं अस्तित्वात संपून जाणार याची मला भीती वाटते,
आपण आदिवासी आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, स्वाभिमान वाटला पाहिजे, असे स्पष्ट करून डॉक्टर हिना गावित पुढे म्हणाल्या, मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे संपूर्ण राजकारण आदिवासी विकास साधण्यासाठी जेवढे समर्पित राहिले तितकेच आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी सुद्धा वाहिलेलेवाहिलेले आहे. प्रत्येक वेळी मंत्री म्हणून निर्णय घेताना आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आदिवासींच्या कल्याणाचे आणि आदिवासी संस्कृतीला दृढ करणारे निर्णय केले.
प्रमुख उद्घाटक म्हणून बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी आवाहन केले की, आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी आपल्या घरापासूनच सुरुवात केली पाहिजे. आपल्या कला सादरीकरणात आदिवासी प्रथा परंपरा सांगणाऱ्या गोष्टी आल्या पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या आदिवासी भाषा या ठिकाणी बोलल्या जातात आणि वेगवेगळ्या भाषा जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण वेगळे नसतो. आपण एकच आहेत, ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे.
पुढे बोलताना डॉक्टर सुप्रिया गावित यांनी सांगितले की, या सोबतच आपल्यातले क्रीडा कौशल्य वाढवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने लक्ष केंद्रित करावे. आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी यासाठी विशेष प्रोत्साहन देणाऱ्या योजना पूर्वीपासून अमलात आणले आहेत. डॉक्टर हिना गावित यांच्या प्रयत्नांमुळे ऑलिंपिक क्रीडापटू हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून कसे आर्थिक सहाय्य मिळाले आणि तिच्या क्रीडा कौशल्याचा कसा विकास होऊ शकला याचा किस्साही डॉक्टर सुप्रिया गावित यांनी ऐकवला.