नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी तज्ञ डॉक्टरांची व सुसज्ज रुग्णालयाची सेवा मोफत आणि किफायतशीर दरात उपलब्ध व्हावी. अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. त्यानुसार बडोदा येथील पारुल आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि नंदुरबार येथील वेलनेस रिटेल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी निशुल्क आयुर्वेदिक चिकित्सा आणि उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन वेलनेस रिटेलचे नंदुरबार समन्वयक विनयभाई श्रॉफ यांनी केले आहे.
या संदर्भात माहिती देण्यासाठी गुळवाडी येथील सभागृहात पत्र परिषद झाली. या पत्र परिषदेस पुनीत पारेख उपस्थित होते. विनय श्रॉफ यांनी पुढे माहिती देताना सांगितले की,नंदुरबार जिल्ह्यातील गरजू रुग्णांना तज्ञ डॉक्टरांमार्फत आणि सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करून देणे, रक्त, लघवी तपासणी देखील सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावी. या आरोग्य सेवेबाबत वेलनेस रिटेलच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून सातत्याने जनमानसात माहिती देण्याचे काम करीत आहोत. सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय लोकांचे आरोग्य उपचार स्वस्त आणि तज्ञ डॉक्टरांद्वारे व्हावे या हेतूने मोफत आरोग्य शिबिराचा प्रवास सुरू केला. या प्रवासात बडोदा येथील पारूला आयुर्वेद हॉस्पिटल या राष्ट्रीय मानांकित हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत भव्य आयुर्वेदिक तपासणी उपचार व आयुर्वेदिक औषधी वाटप शिबिर रविवार दि. 28 जुलै रोजी सकाळी दहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत बाबुभाई चक्कीवाला वाडी, विमल एम्पोरियम यांच्या मागे, टिळक रोड, नंदुरबार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या शिबिरात सर्व रोगांचा रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे.
या शिबिरात बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, महिलांचे आजार आणि प्रसूती तंत्र या संदर्भात बडोदा येथून तज्ञ डॉक्टरांची टीम दाखल होणार आहे. पंचकर्म व शल्य सर्जरी मोफत बडोदा येथे केली जाईल तसेच ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आवश्यक आहे त्यांना बडोदा येथे मोफत जाण्याची व येण्याची व्यवस्था संयोजकांतर्फे करण्यात आली आहे. बडोदा येथील पारुल हॉस्पिटल सोबत आयोजित मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी व उपचार शिबिरामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना वेलनेस रिटेल कार्ड मोफत देण्यात येईल. त्याद्वारे भविष्यात पारुल हॉस्पिटल बडोदा येथे मोफत उपचार करण्यात येईल.नंदुरबार जिल्ह्यातील सर्व जनतेने या मोफत शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
वेलनेस रिटेल तर्फे कमी दरात औषधी सेवा म्हणून घरपोच पुरवठा करण्याचा देखील अभिनव प्रयोग प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचा मानस विनय श्रॉफ यांनी व्यक्त केला.ना नफा ना तोटा या तपावर हा उपक्रम असल्याचे पुनीत पारेख यांनी सांगितले.