नंदुरबार l प्रतिनिधी
जल जीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराबाबत जिल्हा परिषदेवर छेडण्यात आलेल्या धरणे आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी सभागृहात बोलावलेल्या दालनात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः त्यांना धारेवर धरत प्रश्नांच्या बडीमार करीत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.विभाग निहाय चौकशी करून प्रस्ताव महसूल आयुक्तांकडे पाठवण्यात येईल त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.
दुपारी ११ वाजेला सुरू झालेले धरणे आंदोलन दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सावतकुमार यांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बोलावले. यावेळी खा.ॲड गोवाल पाडवी माजी मंत्री ॲड के.सी पाडवी यांच्यासह अन्य उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत जिल्हा परिषदेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जल जीवन मिशन, कृषी विभागातील सौर दिवे तसेच बांधकाम विभागातील योजनांमध्ये भ्रष्टाचार झालेला असून, दोषी अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी खा.गोवाल पाडवी यांनी केली. नंदुरबार हा आक्षांकित जिल्हा असून, योजनेत भ्रष्टाचार व अनियमितामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे नुकसान होत असते. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी माजी मंत्री ॲड. के.सी पाडवी यांनी केली.
चर्चेत माजी मंत्री ॲड के.सी पाडवी, आ.शिरीषकुमार नाईक,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी, जि.प माजी उपाध्यक्ष जयपालसिंग रावल,शहादा बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, मोहन शेवाळे आदींनी सहभाग घेतला.