तळोदा l प्रतिनिधी
सातपुड्यातील डाकीण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नंदूरबार जिल्हा वतीने तीन दिवसीय जिल्हास्तरीय डाकीण प्रथा विरोधी प्रबोधन संवाद यात्रा आयोजित करण्यात आली.या यात्रेचे उद्घाटन तळोदा येथे पोलीस पाटलांची परिषद घेऊन करण्यात आले.
जिल्ह्यातील धडगाव,अक्कलकुवा मोलगी पोलीस ठाण्यात मागील महिनाभरात सात ते आठ डाकीण प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.डाकीण प्रकरणांत झालेली वाढ यासंदर्भात प्रबोधन व संवादाची भूमिका घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डाकीण प्रथा विरोधी प्रबोधन संवाद यात्रा काढण्यात आली आहे.
या प्रबोधन संवाद यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, प्रशासनातील अधिकारी,पोलीस पाटील, स्थानिक संस्थांचे लोकप्रतिनिधी,विविध सामाजिक संस्था-संघटना यांच्या भेटी घेऊन त्यांना डाकीण प्रश्नाची दाहकता लक्षात आणून देण्यात येणार आहे. डाकीण प्रथा निर्मूलनासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन या प्रश्नावर व्यापक भूमिका ठरवण्याचा या यात्रेमागील उद्देश आहे.
पीड़ित महिलांशी संवाद,कायदेशीर मदत करणे व त्यांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी मदत करणे इत्यादी बाबी या यात्रे अंतर्गत घेण्यात येणार आहेत.ही यात्रा तळोदा अक्कलकुवा,मोलगी धडगाव,शहादा कळंबू नंदुरबार खांडवारा विसरवाडी,नवापूर अशा गावातून जाणार आहे.
तळोदा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात या डाकीण प्रबोधन संवाद यात्रेचे पोलीस पाटीलांची परिषद घेवून उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी नायब तहसीलदार निशा नाईक, सहायक प्रकल्प अधिकारी उत्तम राऊत, पोलीस उपनिरिक्षक धर्मेंद्र पवार, गटशिक्षण अधिकारी शेखर धनगर,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ ठकसेन गोराणे,राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ डी बी शेंडे,जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र पाटील,प्रधान सचिव वसंत वळवी,राज्य सोशल मीडिया विभाग प्रमुख किर्तीवर्धन तायडे,तळोदा उपाध्यक्ष तारा मराठे,सिद्धार्थ महिरे,डॉ किशोर सामुद्रे,पोलीस पाटील संघटनेचे बापू पाटील,बबन इंद्रजित, सावित्री पाडवी,आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते पाण्याद्वारे दिवा प्रज्वलित करून प्रबोधन यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या उद्घाटन मनोगतक पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार यांनी समाजातून डाकीण प्रथा निर्माण साठी पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.गटशिक्षणाधिकारी धनगर यांनी विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शिक्षणाद्वारे प्रयत्न करून समाजातील अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी प्रबोधन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.उत्तम राऊत यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव नंतर देखील समाजात डाकीण सारख्या अनिष्ट व अघोरी प्रथांवर चर्चा व प्रबोधन करावे लागते याबाबत खंत व्यक्त केली.
प्रास्ताविक राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी केले त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात असलेला डाकीण प्रश्न पोलीस पाटलांसमोर मांडला.अनिस माध्यमातून या प्रश्नी झालेल्या कामाची माहिती दिली व डाकीण प्रकरणांत पोलीस पाटलांची भूमिका विशद केली.डॉ गोराणे यांनी डाकीण केवळ आदिवासी भागातच नाही तर महानगरांमध्ये सुद्धा आढळून येत असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन मुकेश कापुरे,यशस्वीतेसाठी शाखा कार्याध्यक्ष प्रा.सुनिल पिंपळे,सचिव अमोल पाटोळे,हंसराज महाले,सिद्धेश्वर गायकवाड,यांनी परिश्रम घेतले.