नंदुरबार l प्रतिनिधी
अवैधरित्या गावठी रिव्हॉल्वर सोबत बाळगणाऱ्यास शहादा न्यायालयाने 2 वर्ष कारावासाची शिक्षा व दंड ठोठावला आहे.
शहादा येथील वडगाव या गावात काही लोक गावठी बनावटीचे रिव्हॉल्वर विक्री करीत असल्याची गोपनीय बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आर. एस. रायसिंग यांना मिळाल्याने स्वतः पोलीस निरीक्षक रायसिंग, पोलीस उपनिरीक्षक बी. आर. गणकवार, व स्टाफ अशांनी बातमीची सत्यता पडताळण्यासाठी मौजे वडगाव ता. शहादा येथे गेले. त्याठिकाणी पोलीस निरीक्षक व स्टाफ असे वडगाव बसस्थानक परीसरात दबा धरुन बसले असतांना एक इसम बस थांब्याकडे येतांना दिसला त्याचे हालचाली व हावभाव हे संशयास्पद वाटल्याने सदर संशयितास थांबवून विचारपूस करता तो झटापट करुन पळू लागला. त्याचा पाठलाग करुन पोलीसांनी त्यास विचारपूस करता त्याने त्याचे नाव प्रेमराज बाबूलाल पावरा असे सांगितले.
सदर व्यक्तीची अंगझडती घेता त्याचा जवळ एक गावठी बनावटीचे रिव्हॉल्वर विनापरवाना बाळगत असल्याचे मिळून आले. त्यानुसार सदर इसम प्रेमराज पावरा यास ताब्यात घेण्यात आले व शहादा पोलीस ठाणे येथे गुरनं. 38/2012 भारतीय हत्यार कायदा कलम 3 चे उल्लंघन 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि-बी. आर. गणकवार यांचेकडेस देण्यात आला होता. पोउपनि- बी. आर. गणकवार व त्यांचे सहकारी पोलीस यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी प्रेमराज बाबूलाल पावरा, वय-38, रा. मौजे वडगाव ता. शहादा जि. नंदुरबार याचे विरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, शहादा यांचे न्यायालयात सादर केले होते.
सदर खटल्याची सुनावणी व्ही. व्ही. निवघेकर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, शहादा यांचे समक्ष झाली आहे. सरकारी पक्षाचे वतीने सहा. सरकारी अभियोक्ता अॅड. एल.आर. वळवी यांनी काम पाहीले. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, पंच व इतर साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली. त्यावरुन आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने व्ही. व्ही. निवघेकर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, शहादा यांनी आरोपी प्रेमराज बाबूलाल पावरा, वय-38, रा. वडगाव ता. शहादा जि. नंदुरबार यास भारतीय हत्यार कायदा कलम 3 चे उल्लंघन 25 अन्वये दोषी ठरवत 02 वर्ष सश्रम कारावास व रुपये 2 हजार अशी दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
खटल्याचे सुनावणी दरम्यान पोउपनि छगन चव्हाण, पैरवी अधिकारी तसेच पैरवी अंमलदार पोहेकॉ परशूराम कोकणी यांनी कामकाज पाहीले आहे. सदर गुन्हयातील तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच सरकारी अभियोक्ता यांचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस व मा.अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहादा दत्ता पवार, शहादा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी अभिनंदन केले आहे.