नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने अ-जामीनपात्र वॉरंटमधील जिल्हयाभरातील एकूण 44 आरोपींना अटक केली आहे.
नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात वॉरंट बजावणीची मोहीम सुरु असतांना मागील 20 दिवसात जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांमार्फतीने अ-जामीनपात्र वॉरंट मधील एकूण 44 इसमांना अटक करण्यात आली आहे.
त्यामध्ये असे की, न्यायालयाने यापुर्वी समन्स काढले होते, त्या समन्सची बजावणी पोलीसांनी केली होती. समन्स बजावूनही त्यातील इसम न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांचे जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते, जामिनपात्र वॉरंटाची देखील बजावणी पोलीस ठाण्यांमार्फतीने करण्यात आली होती, परंतु जामीनपात्र वॉरंटातही काही इसम गैरहजर राहील्याने त्यांना मा. न्यायालयाचे आदेशान्वये एकुण 44 इसमांना विविध पोलीस ठाण्यांमार्फतीने अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा दत्ता पवार यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणे प्रभारी व स्टाफ अशांनी केली आहे.
“तरी सर्व नागरिकांना पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, न्यायालयामध्ये आपल्या चालू असलेल्या केसेस बाबत समन्स/जामीनपात्र वॉरंटमध्ये वेळोवेळी हजर राहुन न्यायालयातून वॉरंट रद्द करुन घ्यावे, जेणेकरून अ-जामीनपात्र वॉरंटान्वये होणारी अटकेची कारवाई टाळता येईल.”
तसेच यापुढेदेखील अशा प्रकारची कारवाई जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु राहील याबाबत पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी सांगितले आहे.