नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील काकर्दे येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिन हा स्मशानभूमीत महिलांनी सुमारे 500 रोपाचे वृक्षारोपण करुन साजरा केला. या अनोख्या उपक्रमाने काकर्देच्या सरपंच रेखाबाई माळी यांच्यासह महिलांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. याच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार तालुक्यातील काकर्दे ग्रामपंचायतीतर्फे सरपंच रेखाबाई राकेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपणाने महिला दिन साजरा करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सरपंच, ग्रा.पं.सदस्य, बचतगट, अंगणवाडी सेविका व मोलमजुरी करणार्या महिलांनी एकत्र येवून जागतिक महिला दिनी वृक्षारोपण केले. काकर्दे गावातील स्मशानभूमीत सुमारे 500 रोपांची लागवड करुन वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच सदर वृक्षांची संवर्धनाची जबाबदारी देखील घेण्यात आली. याप्रसंगी सरपंच रेखा राकेश माळी, ग्रा.प.सदस्या विमलबाई महाजन, कलाबाई भिल, हिराबाई माळी, सुरेखाबाई पाडवी, महिला बचतगटच्या शोभाबाई मराठे, छायाबाई माळी, अंगणवाडी सेविका मनिषा माळी, महिला बचतगटाच्या ज्योती माळी, रत्नाबाई खलाणे, सुरेखा माळी, गितांजली खलाणे .मंगलाताई साळुंखे, वैशाली खलाणे, मुक्ताबाई बागुल, जयश्री शुक्ल, सगिता बागुल, सपना मराठे, योगिता मराठे, छाया मराठे, शारदा खलाणे .ज्योतीबाई मिस्त्री, प्रतिभा मराठे, मंगल माळी आदी उपस्थित होते.