शहादा l प्रतिनिधी
पालिकेमार्फत मालमत्ता करावर आकारण्यात येणारी शास्तीची रक्कम माफ करण्यात यावी अशी मागणी पालिकेचे माजी गटप्रमुख,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील यांनी केली आहे.
शहादा नगरपालिका प्रशासक मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांना प्रा.मकरंद पाटील यांनी दिलेल्या पत्राचा आशय असा,नगरपालिका वसुली विभागाच्या वतीने शहरातील मालमत्ता धारकांना कर आकारणीवर शास्तीची रक्कम लावण्यात आली आहे.सदर रक्कम भरणे शहरातील मालमत्ता धारकांना आर्थिक अडचणीचे होणार आहे.
परिणामी नगरपालिकेच्या वसुलीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.या पत्राद्वारे सूचित करू इच्छितो की, महानगरपालिका अधिनियमानुसार जळगाव महानगरपालिकेने शास्तीची रक्कम माफ करण्यासाठी जाहीर आवाहन वजा जाहिरात एका दैनिकात प्रकाशित केली आहे. त्यातील मजकूर असा:-महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम “अनुसूची ड” प्रकरण आठ “कराधान नियम” ५१ अन्वये आपल्या स्वेच्छा निर्णयानुसार कराधान नियम ४१ खालील शास्ती पूर्णतः किंवा अंशतः माफ करण्याचा अधिकार मा. आयुक्त यांना प्राप्त आहे. त्यानुसार मा. आयुक्त जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव यांनी कराधान नियम ४१ अंतर्गत थकीत रकमेवरील आकारलेल्या शास्तीत सवलत देणेसाठी दि. ०८/०२/२०२४ ते दि.२९/०२/२०२४ या कालावधीत मालमत्ता करावरील अभय शास्ती योजना राबविलेली होती.या योजनेस नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पाहता सदर योजनेचा कालावधी दि.०१/०३/२०२४ ते १५/०३/२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे.
उपरोक्त जाहीर आवाहन तसेच शासन निर्णयाचा संदर्भ घेऊन आपणही शहादा नगर पालिका हद्दीतील मालमत्ता धारकांना आकारण्यात आलेल्या शिस्तीच्या रक्कमेतून अभय देत अधिकची रक्कम माफ करणेबाबत योग्य निर्णय घेण्याची अपेक्षा आहे.ज्यामुळे शहरातील मालमत्ता धारकांना कर भरणा करणे सोयीचे होईल.तसेच पालिकेच्या कर वसुलीतही यामुळे वाढ होऊन उत्पन्न वाढ होणार आहे.तरी शास्तीची रक्कम माफ करणेबाबत आपल्या स्तरावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.याबाबत मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी लवकर शहरवासीयांच्या हिताचा निर्णय घेण्याची अपेक्षा शहरातील मालमत्ता धारकांकडून व्यक्त केली जात आहे.