नंदुरबार l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या अमृत भारत स्टेशन योजनेमुळे नंदुरबार रेल्वे स्थानकाला चौथा नवा प्लॅटफॉर्म मिळणार असल्याबरोबरच दोन प्लॅटफॉर्मवर लिफ्टची सोय करून मिळणार आहे; अशी माहिती देतानाच खा. डॉ.हिना गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग आणि वयोवृद्ध प्रवाशांची सोय व्हावी म्हणून माझ्या खासदार निधीतून बॅटरी प्लॅटफॉर्मवर फिरू शकणाऱ्या बॅटरी ऑपरेटेड गाड्या उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली.
भारतीय रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी अमृत भारत स्टेशन योजना अलीकडेच सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत रेल्वे अपग्रेड, आधुनिकीकरणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, रनाळे आणि चिंचपाडा या तीन रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामाचा ई- शुभारंभ म्हणजे ऑनलाइन शुभारंभ दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आला. त्यासाठी नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रशस्त सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या सोहळ्याप्रसंगी खा. डॉ.हिना गावित या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑन स्क्रीन सोहळा पार पडत असताना नंदुरबार येथे खा. डॉ.हिना गावित यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, रेल्वे विभागाचे कुशल सिंग हेमंत महावार, आर के रंजन, लखनलाल मीना ,अमरेंद्र कुमार , संदीप कुमार, गजेंद्र शर्मा आणि अन्य प्रमुख अधिकारी, भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नंदुरबार स्थानकाला मिळणार या सुविधा
प्रारंभी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या आणि नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर कसे प्रयत्नशील आहोत याविषयी सविस्तर सांगितले. प्रमुख भाषण करताना खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी रेल्वे मार्ग किती महत्त्वाचा आहे आणि पहिल्यांदा खासदार बनल्या तेव्हापासून म्हणजे 2014 पासून रेल्वे सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले. याविषयी विश्लेषित माहिती दिली. खासदार बनल्यापासून दिल्लीमध्ये पाठपुरावा केला आणि नवीन नवीन रेल्वे गाड्या मंजूर करून दिल्या, लोकलच्या धरतीवर चालणारी मेमो ट्रेनची सेवा मिळवून दिली, अनेक वर्ष रखडलेले उधना भुसावळ रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्णत्वास आणून दिले. नंदुरबार रेल्वे स्थानकाचा हेरिटेज लुक कायम ठेवत अनेक आधुनिक सुविधा मिळवून दिल्या.
त्या पाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी लागू केलेल्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नंदुरबार रनाळे आणि चिंचपाडा या तीन स्थानकांचा समावेश करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या कामांचा शुभारंभ आज पार पडत आहे; असे सांगून खासदार डॉक्टर हिना गावित पुढे म्हणाल्या की, नंदुरबार रेल्वे स्थानकावर सध्या स्थितीत तीन प्लॅटफॉर्म आहेत आता लवकरच चौथा प्लॅटफॉर्म उभारला जाईल. नंदुरबार रेल्वे स्थानकावर इकडच्या बाजूने तिकीट खिडकीची एकच सोय आहे आता रेल्वे स्थानकाच्या पलीकडच्या बाजूने आणखी तिकीट खिडकी सुरू केली जाणार असून रेल्वे पट्ट्याच्या पलीकडील सर्व लोकांना त्याचा लाभ होईल.
वृद्ध आणि वयस्कर प्रवाशांची सोय व्हावी म्हणून दोन प्लॅटफॉर्मवर लिफ्ट बसवण्यात येणार आहे त्याचबरोबर खासदार निधीतून प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या बॅटरी ऑपरेटेड गाड्या लवकरच उपलब्ध करून देईन ज्यामुळे ओझे घेऊन आलेल्या वयस्करांची आणि दिव्यांग प्रवाशांची सोय होईल. दुचाकी चोरी आणि तत्सम गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात तसेच रेल्वे स्थानकात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. अमृत भारत स्टेशन योजनेतून अशा सर्व प्रकारचे लाभ प्रवाशांना मिळणार असून त्यासाठी 11 कोटी रुपयांचा निधी मोदी सरकारने मंजूर केला आहे. अधिक अधिक आधुनिक सोयी सुविधा प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत; असेही खासदार डॉक्टर हिना गावित म्हणाल्या. यानंतर भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी यांनी देखील मोदी सरकारमुळे तसेच खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रयत्नामुळे होत असलेल्या विकास कामांचा उल्लेख करून खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या कार्याचे कौतुक केले.