नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मराठेकालिन २५०-३०० वर्षांपूर्वीची पुरातन तोफ आहे तीअतिशय दुरावस्थेमध्ये असून ही तोफ शासकीय विश्रामगृहाच्या एका सभागृहाच्या मागे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आजूबाजूला कचरा त्याठिकाणी टाकून देण्यात आली आहे.
सदर तोफ ही ऐतिहासिक असून तिला सन्मानाने ठेवावे आणि तोफसंदर्भात हलगर्जीपणा करणारे दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांचावर कठोर कारवाई करावी अशी मागणी हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, जयेश भोई यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून मराठेकालीन २५० ते ३०० वर्षांपूर्वीचे तोफ ही शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर सुअवस्थेत ठेवलेले होती, परंतु गेल्या काही वर्षापासून सदर तोफ त्या ठिकाणी दिसून येत नव्हती. यासाठी हिंदू सेवा सहाय्य समिती मार्फत नंदुरबार शहरात अशा किती तोफ आहेत याच्या मागोवा घेण्याच्या प्रयत्न केला असता इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ.सर्जेराव भामरे यांना संपर्क केला आणि नंदुरबार शहरात पुरातन किती तोफ उपलब्ध होत्या याची माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, नंदुरबार शहरात शासकीय विश्रामगृह आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय या ठिकाणी मराठेकालीन सुमारे २५० ते ३०० वर्षांपूर्वीच्या तोफ आहेत. त्याआधारे शासकीय विश्रामगृह या ठिकाणी तोफेची शोध घेतला असता २५०-३०० वर्षापूर्वीची तोफ अतिशय दुरावस्थेमध्ये मिळून आली ही तोफ शासकीय विश्रामगृहाच्या एका सभागृहाच्या मागे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आजूबाजूला कचरा होता त्या ठिकाणी फेकलेली मिळून आली म्हणजे तिच्या कुठलाही सन्मान न ठेवता तिची कुठली निगा न ठेवता अतिशय दुरावस्थेत टाकून दिलेली आहे. तर दुसरी तोफ रेस्ट हाऊस किंवा पी डब्लू डी याठिकाणी मिळून आली नाही.
शासकीय विश्रामगृह येथील तोफेची सन्मानाने निगा ठेवली जात नसेल तर सदर तोफ हिंदु सेवा सहाय्य समिती किंवा राजवाडे इतिहास संशोधन मंडळ, धुळे यांचे स्वाधीन करावी तसेच रेस्ट हाऊस व्यतिरिक्त असलेली आणखी एक तोफ कुठे आहे याचा शोध घ्यावा आणि या दोन तोफसंदर्भात हलगर्जीपणा करणारे दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांचावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.








