नंदुरबार l प्रतिनिधी-
येत्या काळात लोकसभा निवडणूकीत महायुतीतील भाजपा उमेदवार लोकसभा मतदार संघातून निवडून आणण्यासाठी सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबर कसा, असे सांगत एकतेत बाधा ठरणाऱ्या कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांना नारळ द्या असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले. ते नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आयोजित महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
याप्रसंगी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जि.प.सभापती हेमलता शितोळे, जि.प.सदस्य मोहन शेवाळे, आरपीआय जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, रासप जिल्हाध्यक्ष पुष्पा थोरात आदी उपस्थित होते. यापुढे मंत्री पाटील म्हणाले की, सन २०२४ निवडणूकांचे वर्ष आहे. या वर्षात देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठीचा निर्णय घेण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे. कार्यकर्त्यांकडे पक्षाचे काम करण्याचे खरे बळ आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदारांचे लोकसभेत पहिले नाव असते. सुदैवाने सत्तेतील खासदार असल्याने मतदार संघाचा विकास होत आहे.
गेल्या ९ वर्षापासून जिल्ह्यात विकास होत असून यापुढेही विकास करावयाचा असेल तर महायुतीच्या खासदार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यामुळे साऱ्यांनी रुसवे-फुगवे, मतभेद विसरुन देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आले पाहीजे. जिल्ह्यात विकासाची कामे सुरु असली तरी यास कॉँग्रेसकडून विरोध होत असतोे. देशभरात कॉँग्रेसने विरोध केला असला तरी देखील देशाच्या प्रगतीचा उच्चांक आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. आगामी काळ महायुतीला सक्षम करणारा ठरणार आहे.
पालकमंत्री पदाची धूरा सांभाळल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांना विकासासाठीचा समान निधी वाटप करुन न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळामध्ये उद्योग, सिंचन यासाठी विविध प्रकल्पांच्या जास्तीत जास्त प्रशासकीय सुधारीत मान्यता आणण्यासाठीचा प्रयत्न सुरु आहे. तापी-बुराई उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. सन २०१४ नंतर देशाची झालेली प्रगती दखल घेण्यायोग्य आहे. दि.२२ जानेवारी रोजी अयोध्या येथील भगवान श्री राम यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा एक ऐतिहासिक सोहळा होणार असून याचे भागिदार व साक्षीदार होणार असल्याने आनंदोत्सव साजरा केला पाहीजे. आगामी काळामध्ये लोकसभा निवडणूकीसाठी सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा उमेदवार असेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. भाजपाच्या खासदाराला निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सर्वाधिक मेहनत घ्या, असेही पाटील यांनी सांगितले. आ.जितेंद्र आव्हाड यांनी मागील आठवड्यात प्रभू श्री राम यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याने देशभरातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामुळे आव्हाडांना ठाण्यातील हॉस्पिटलमधील औषधांची गरज असल्याचा उपरोधिक वक्तव्य मंत्री पाटील यांनी केले.

प्रास्ताविक भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी केले. ते म्हणाले, तिन्ही पक्षामधील अंतर कमी व्हावे, गोडवा निर्माण व्हावा यासाठी महायुती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आता राज्य व केंद्र सरकार तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचविणारे सरकार आहे. यामुळे मतभेद विसरुन राष्ट्रहित, राज्य हितासाठी एकत्रित येण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांनी एकमेकांचा आदर ठेवण्याची गरज गावित यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे म्हणाले की, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता लोकसभा निवडणूकीसाठी व निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाला आहे.
स्थानिक निवडणूकांमध्ये पक्ष श्रेष्ठींकडून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. यामुळे केंद्र व राज्य स्तरावरील निवडणूकांमध्ये पक्ष श्रेष्ठींच्या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी आदर केला पाहीजे. महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्व घटक पक्षांनी कंबर कसली पाहीजे. पालकमंत्री अनिल पाटील यांनी विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी कंबर कसली आहे. मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होत विकासाचे इंजिन आता भरधाव धावत असून तळागाळातील गरजूंपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहचविला जात असल्याचे डॉ.मोरे यांनी सांगितले. भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी सन २०१४ पासून देशात विकासाची घोडदौड सुरु असल्याचे सांगत २०१४ पूर्वी व त्यानंतर झालेला विकास कितीतरी पटींनी अधिक असल्याचे सांगितले. आरपीआयचे अरविंद कुवर यांनी रखडलेली विकासकामे मार्गस्थ लागण्याची अपेक्षा व्यक्त केली. सुत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले.








