नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तहसील कार्यालयात प्रतिबंधात्मक कारवाईदरम्यान दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात कारवाई टाळण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्विकारतांना खासगी पंटरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की, नवापूर येथे तक्रारदार यांच्यासह एकूण १३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या इतर साथीदारांवर केलेली प्रतिबंधात्मक कारवाई तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना सांगून बंद करण्यासाठी खासगी इसम हनू उर्फ अनक रामा वळवी रा.सोनारेदिगर ता.नवापूर याने तक्रादाराकडून सुरुवातीला प्रत्येकी १ हजार रुपयांप्रमाणे १३ जणांचे १३ हजार रुपयांची मागणी केली.
याबाबत पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत अनक वळवी याने तडजोडीअंती १० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी ७ हजार रुपये तक्रारदाराकडून आधीच स्विकारले आहेत. तर सापळा कारवाईदरम्यान संशयित अनक वळवी याने तक्रारदार व त्यांचे इतर साथीदारांकडून १३ जणांविरुद्धची प्रतिबंधक कारवाई टाळण्यासाठीच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ३ हजाराची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
सदरची कारवाई सापळाधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभगााचे पोलिस उपअधिक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक समाधान वाघ, माधवी वाघ, पोहेकॉ.विलास पाटील, अमोल मराठे, देवराम गावित, संदिप नावाडेकर,पोहेकॉ.विजय ठाकरे, ज्योती पाटील, जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली आहे.








