नंदुरबार l प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणूकीत खा.डॉ.हीना गावित यांना भाजपातर्फे तिकीट मिळू नये यासाठी पक्षांतर्गतच प्रयत्न होत असल्याच्या चर्चा खोटी असून असे सिद्ध केल्यास राजकारणातून संन्यास घेईन असे प्रतिआव्हान भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केले असून ते भाजपातर्फे घर चलो संपर्क अभियानासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या अभियानांतर्गत दि.२३ ते २५ या कालावधीत उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून दि.२३ रोजी नंदुरबार येथे घर चलो अभियानांतर्गत आयोजन करण्यात आले त्याची माहिती देताना बोलत होते.
नंदुरबार येथे पत्रकार परिषदेप्रसंगी श्री.चौधरी बोलत होते. यापुढे ते म्हणाले की, लोकसभा प्रवास योजनेंतर्गत भाजपाच्यावतीने घर चलो संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानादरम्यान सुपरवॉरियर्सची बैठक घेण्यात येत आहे. या अभियानादरम्यान दि.२३ रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नंदुरबार जिल्ह्यात येत असून सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात जिल्ह्यातील चार विधानसभा व साक्री विधानसभा मतदार संघातील सुपरवॉरियर्स व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. यानंतर दादा गणपती ते जळका बाजार दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे नागरिकांच्या भेटी घेणार आहेत.
तसेच यावेळी शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा जागर देखील करण्यात येणार असल्याचे विजय चौधरी यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, सांस्कृतिक आघाडी राज्य उपाध्यक्ष निकेश राजपूत, अर्जुन मराठे उपस्थित होते.
यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की,आगामी लोकसभा निवडणूकीत खा.डॉ.हीना गावित यांना भाजपातर्फे तिकीट मिळू नये यासाठी पक्षांतर्गतच प्रयत्न होत असल्याच्या चर्चा रंगत आहेत.यावर विजय चौधरी यांनी सांगितले की, खा.डॉ.हीना गावित यांचे काम उत्तम आहे. त्यांना तिकीट मिळू नये यासाठी कोणीही पक्षांतर्गत असे प्रयत्न केलेले नाहीत. माझ्या संदर्भात व पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यासंदर्भात अशा प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. या चर्चांमध्ये कोणतेही तथ्थ्य असे केले असल्यास कोणी सिध्द केले तर राजकारणातून संन्यास घेईल, असे प्रतिआव्हान विजय चौधरी यांनी दिले आहे.








