नंदुरबार l प्रतिनिधी
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या संयुक्त दायित्व गटांच्या पथदर्शी दुग्धविकास प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना आत्मनिर्भर करण्यासाठी संयुक्त गटांना दुधाळ गायींचे वितरण करण्यात येत असून, त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना आपल्याच गावात आपल्या हक्काचा रोजगार मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
ते नंदुरबार तालुक्यातील लक्ष्मीखेडा येथे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या संयुक्त दायित्व गटांच्या पथदर्शी दुग्धविकास प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना दुधाळ गायींच्या वितरण समारंभात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित माजी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा डॉ. कुमुदिनी गावित, माजी आमदार शरद गावित जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, अर्चना गावित, राजेश्री गावित शबरी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड नंदुरबार एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार व विवध यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी बांधवांच्या उत्पन्न वाढीसाठी ज्या आदिवासी व्यक्तीकडे जमिन आहे, त्यांना कृषि साहित्य, बि-बियाणे उपलब्ध करुन देणे, त्यांच्या शेतात विहिर बांधण्यासाठी अर्थ सहाय्य करणे अशा योजना राबविण्यात येणार असून ज्या आदिवासी व्यक्तींना मच्छिमारी व्यवसाय करावयाचा असेल त्यांना केज फिशिंग सुविधा उपलब्ध करून देणे, ज्यांना जोड धंद्या म्हणून दुग्धव्यवसाय करावयाचा आहे, त्यांना दुधाळ जनावरे उपलब्ध करुन देणे,
ज्यांना बकरी पालनाचा व्यवसाय करावयचा आहे, त्यांना बकरी उपलब्ध करुन देणे, कृषि व कृषि विषयाशी संबंधित विविध योजना, शासनाचे इतर विभाग व आदिवासी विभागामार्फत विविध योजना सुरू करण्यात आल्या असून आदिवासी बांधवांचे उत्पन्न वाढविणे हा या सर्व योजनांच्या मागचा उद्देश आहे. आदिवासी भागात वनसंपत्ती विपुल प्रमाणात आहेत. उपलब्ध वनसंपत्तीचा वापर करून प्रक्रिया उद्योगासाठी अनेक महिला बचतगट, उद्योग संस्था पुढे येत आहेत. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या प्रक्रिया उद्योगांसाठी आदिवासी उद्योजकांना आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. आदिवासी बांधवांना उद्योजकतेच्या प्रशिक्षणातून व्यवसाय उपलब्ध करून त्यांना आर्थिक सक्षम कसे करता येईल यादृष्टीने शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यरत आहे. येणाऱ्या काळात आदिवासी बांधवांनी प्रक्रिया उद्योगातून तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत संयुक्त दायीत्व गटांच्या माध्यमातून पथदर्शी दुग्धविकास प्रकल्पातून या योजनेची अंमलबजावाणी सुरू असून महाराष्ट्र, गुजरात राज्याच्या सीमावर्ती क्षेत्रातील नाशिक, पालघर, नंदुरबार जिल्ह्यात गुजरातमधील सुमुल सहकारी दुग्ध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ही योजना पाच वर्षात यशस्वी करून आदिवासी कुटुंबांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे. सुमारे २ हजार ५०० संयुक्त दायीत्व गटांच्या माध्यमातून १२ हजार ५०० लाभार्थ्यांना कुटुंबांना ही योजना देण्याचे उद्दिष्ट आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, शबरी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांचीही भाषणे झाली. तसेच ९७ गटांना दुधाळ गायींचे वितरण पत्र वितरीत करण्यात आले.








