नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरातील मेन रस्त्यावरील समता ट्रेडिंग कंपनीचे संचालक यांच्या राहत्या घरी वरच्या मजल्यावर चोरट्यांनी मोठी मजल मारत रोकड, सोन्या चांदीचे दागिन्यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. या चोरीने नवापूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक माहिती अशी की, नवापूर येथील समता ट्रेडिंग कंपनीचे संचालक ईश्वर टाटिया परिवारासह राजस्थान मधील जोधपूर येथे कुलदैवताचा दर्शनासाठी 13 नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गेले होते.16 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घरी आले. घराचे कुलूप उघडल्याने स्टोअर रूम कपाटातील सामान अस्ताव्यस्त दिसल्याने कल्पना टाटिया अचानक चक्कर आल्याने कोसळल्या.
दिवाळीच्या सुट्टीत चोरटे बंद घरांना टार्गेट करून चोऱ्या करतात.हे नियमित दरवर्षी होते. त्यातील काही चोरटे पोलीस जेरबंद देखील करतात. परंतू शहरातील मुख्य रस्त्यावर भारतीय स्टेट बँकेच्या शेजारी झालेले चोरी नक्की पोलीसांना आव्हान देणारी आहे.
घरातील दोन रूमची खिडकीची ड्रिल तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केली आहे.घराचे काम चालू असल्याकारणाने त्यांच्या सीसीटीव्ही बंद होते त्याचा फायदा घेत चोरांनी डल्ला मारला आहे. सराईत चोरट्यांनी ग्रील तोडण्याच्या साहित्य वापरून चोरी केली.
सदर घटनेची माहिती ईश्वर टाटिया यांनी नवापूर पोलिसांना कळवल्यानंतर तात्काळ नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे पथकासह घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली त्यानंतर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. चोरटे पोलीस कधी जेरबंद करतील याकडे संपूर्ण शहरात लक्ष लागून आहे. वरिष्ठ अधिकारी नवापूर शहरातील वाढत्या चोरी संदर्भात काय ठोस उपाययोजना करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.








