नंदुरबार l प्रतिनिधी
चोरीस गेलेल्या 3 लाख 75 हजार रुपये किंमतीच्या 10 मोटारसायकल हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलिसांना 4आले आहे.
अधिक माहिती अशी की, संजय मोहनलाल जैन, रा. – काका हाऊस, परेदशीपुरा, नंदुरबार यांच्या मालकीची 30 हजार रु. किं.ची एक TVS कंपनीची ज्युपीटर स्कुटर ( क्र.MH-39-Q-5908) २६ ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वा. च्या दरम्यान नंदुरबार शहरातील अंधारे चौक येथील ओम डायग्नोस्टीक अॅन्ड मेडीकल समोर रोडवर लावलेली असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली म्हणुन त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा हा मोटारसायकल चोरीशी निगडीत असल्यामुळे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना आदेश दिला.
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथून चोरीस गेलेल्या मोटारसायकलबाबत गुन्हे शोध पथकाशी चर्चा केली. तसेच चोरीस गेलेल्या मोटारसायकलच्या शोधासाठी 3 पथके तयार केली.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मोटारसायकलची चोरी करणारा एक ईसम हा नवापूर चौफुली परीसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक यांनी पोनि निवृत्ती पवार यांना बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशीत केले त्याअनुषंगाने पोनि निवृत्ती पवार यांनी वर नमुद पोलीस पथकासह नवापूर चौफुली परिसरात सापळा रचला असता संशयीत आरोपी हे एका मोटारसायकलसह येत असतांना दिसुन आले. पोलीस पथकाने त्यांना थांबविण्याचा इशारा केला असता परंतु संशयीत आरोपी हे मोटारसायकलसह पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागले. त्यानंतर पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.
त्याच्याकडे ताब्यात असलेल्या मोटारसायकलबाबत विचारपुस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्यानंतर त्यांना नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे आणुन विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी त्याचे नावे सद्दाम शेख अजीज मिस्तरी, रा. चिराग गल्ली, नंदुरबार ह.मु. सिव्हील हॉस्पीटल जवळील घरकुल, नंदुरबार असे असल्याचे सांगुन त्यांच्या सोबत शहारुख शेख अजीज रा. चिराग गल्ली नंदुरबार ता. जि. नंदुरबार असा असल्याचे सांगुन त्यांनी दोघांनी नंदुरबार शहर येथून मोटारसायकल चोरी केल्याची माहिती दिली. त्यांच्याकडे 30 हजारची एक TVS कंपनीची ज्युपीटर स्कुटर मिळाली असून त्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सदरची मोटारसायकल ही कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केली.
तसेच त्यांच्याकडे अधिक विचारपुस करता त्यांनी आणखीन 9 मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली. सदरच्या मोटारसायकली देखील कायदेशीर प्रक्रीया करुन 3 लाख 75 हजाराच्या मोटारसायकली आरोपी सद्दाम शेख अजीज मिस्तरी याने भारतीय पुरावा कायदा कलम 27 प्रमाणे सिव्हील हास्पीटल जवळील घरकूल वसाहत येथून काढून दिल्याने जप्त करण्यात आल्या.अशाप्रकारे नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील तसेच विविध ठिकाणाहुन चोरी केलेल्या 10 मोटारसायकली हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथकाला यश प्राप्त झाले आहे. तसेच अटक करण्यात आलेले आरोपी यांचे अभिलेख तपासले असता आरोपी सद्दाम शेख अजीज मिस्तरी, शहारुख शेख अजीज यांच्याविरुद्ध यापूर्वी उपनगर पोलीस ठाणे येथे 1 गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, पोसई विकास गुंजाळ, पोहेकॉ जगदिश पवार, पोहेकॉ राजेश येलवे, पोहेकॉ दिपक गोरे, पोना भटु धनगर, पोना बलविंद्र ईशी, पोना स्वप्निल पगारे, पोशि किरण मोरे, पोशि भालचंद्र जगताप, पोशि राहुल पांढारकर, पोशि अनिल बडे, पोशि इम्रान खाटीक, पोशि कल्पेश रामटेके, पोशि युवराज राठोड, पोशि विशाल मराठे, पोशि प्रविण वसावे, पोशि हरीष कोळी, मपोशि निंबा वाघमोडे यांच्या पथकाने केली आहे.








