नंदुरबार l प्रतिनिधी
इयत्ता १० वी १२ वी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या अनु. जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास तसेच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे.
योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यानी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
स्वाधार योजनेच्या अटी व शर्ती मध्ये बदल करण्यात येवुन शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या व योजनेचा लाभ घेवु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांस ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांस ३ टक्के आरक्षण असेल तसेच गुणवत्तेची टक्केवारी ४० टक्के इतकी राहील व त्यासाठी त्यांची गुणवत्ता स्वतंत्र तयार करण्यात येईल.
या योजनेच्या लाभासाठी सन २०२३ २०२४ या शैक्षणिक वर्षात नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या अनु. जाती व नवबौद्ध घटकातील पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा, असेही श्री. वसावे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.








