नंदुरबार l प्रतिनिधी
श्रीरामपूर सारख्या आदिवासी गावात महिला व पुरुषांनी आपल्या एकीच्या बळावर गावाला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र केले आहे . गावात असलेली एकजूट व सकारात्मकता ही वाखाणण्याजोगी आहे . प्रतिकूल परिस्थितीतही गाव स्वच्छतेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे .यापुढेही अशीच एकजूट व सकारात्मक कायम ठेऊन गावाचा लौकिक वाढवावा असे आवाहन संत गाडगेबाबा राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर सचिव चंद्रकांत मोरे यांनी केले.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेच्या राज्यस्तरीय तपासणीसाठी ते श्रीरामपूर ता जि नंदुरबार येथे आले होते . यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते . या समितीत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे , सहाय्यक कक्ष अधिकारी रमेश पात्रे यांचा समावेश होता . जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित , मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर ग्रामपंचायतीने सन 2020 -21 व सन 2021 -22 (संयुक्तपणे ) या वर्षात विभागस्तरावर द्वितीय क्रमांक पटकाविला आहे .यामुळे श्रीरामपूर गावाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .या अनुषंगाने गावाची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरीय तपासणी समितीने आज दि. 30 सप्टेंबर रोजी श्रीरामपूर येथे भेट देऊन तपासणी केली.
समितीचे ग्रामस्थांनी पारंपारिक पद्धतीने शिबली नृत्य , लेझीम नृत्य व पारंपारीक वाद्य वाजवून स्वागत केले . यावेळी समितीने ग्रामस्थांशी संवाद साधत गावात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ग्रामस्थांकडून माहिती जाणून घेतली .यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना समिती अध्यक्ष चंद्रकांत मोरे म्हणाले की ,नंदुरबार जिल्हा हा इतर जिल्ह्यांपेक्षा अजूनही अविकसित जिल्हा आहे .या ठिकाणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही ग्रामस्थांनी एकजूट व सकारात्मकता यांचा मेळ साधत सांडपाणी व्यवस्थापन ,गोबर गॅस , सखी प्रेरणा भवन ,स्मशानभूमीतील वृक्ष लागवड , अमृतवन संगोपन सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यांची कामे केली आहेत व त्याची शाश्वतता टिकवून ठेवली आहे .
गावाने तयार केलेले अमृतवन व स्वच्छतेच्या कामात महिलांचा सहभाग हे गावांसाठी पथदर्शी आहे . यापुढेही ग्रामस्थांनी असाच एकोपा कायम ठेवून शासनाच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करावी असे आवाहनही मोरे यांनी यावेळी केले .
यानंतर समिती अध्यक्ष मोरे यांनी गाव विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी सरपंच शत्रुघ्न गांगुर्डे , ग्रामस्थ शिवदास गांगुर्डे , सविता गांगुर्डे ,माहेश्वरी गांगुर्डे ,सरपंच यशवंत गांगुर्डे ,उपसरपंच निलेश अहिरे , ग्रामसेविका रूपाली देवरे व शरद गायकवाड यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून यापुढेही गावाच्या विकासात सक्रिय सहभाग कायम ठेवण्याचे आवाहन केले .
यानंतर 15 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत सर्व उपस्थित महिला व पुरुषांना समिती अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी स्वच्छतेची शपथ दिली .समितीने गावात फिरून कुटुंब भेटी देत गोबर गॅस ,सांडपाणी व्यवस्थापन व शौचालय वापर ,परिसर स्वच्छता , परसबाग आदीबाबत ग्रामस्थांशी संवाद साधत प्रत्यक्षात पाहणी केली .शाळा , अंगणवाडी , परसबाग ,फुलपाखरू गार्डन , स्मशानभूमी ,अमृतवन ,घनकचरा व्यवस्थापन युनिट येथे भेट देऊन पाहणी केली .
यावेळी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचाल एम .डी . धस सहाय्यक गटविकास अधिकारी अनिल बि-हाडे ,विस्तार अधिकारी सागर राजपूत ,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनील पाटील , माजी सरपंच शत्रुघ्न गांगुर्डे ,सरपंच यशवंत गांगुर्डे ‘ , उपसरपंच निलेश अहिरे ,माजी पंचायत समिती सदस्य बटनशेठ गायकवाड , ग्रामसेविका रूपाली देवरे आदींसह शिक्षक , विविध शासकीय विभागाचे कर्मचारी यांचे सह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते .








