नंदूरबार l प्रतिनिधी
गावठी हातभट्टीची दारु बनविणाऱ्यांविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई करीत 44 ठिकाणी छापे टाकत 5 लाख 21 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आगामी सण / उत्सवाच्या अनुषंगाने समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा व आगामी येणारे सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षकपी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यात गावठी हात भट्टीची दारु निर्मिती करणारे, देशी विदेशी दारुची चोरटी वाहतुक तसेच विदेशी दारु बनविण्यासाठी उपयोगी पडणारे स्पिरीटची वाहतूक करणाऱ्यांविरुध्द् विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याबाबत सुचना सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात 5 सप्टेंबर 2023 रोजी पासून विशेष मोहिमेची सुरुवात झालेले आहे. या दरम्यान 9 सप्टेंबर 2023 रोजी गावठी हातभट्टी तयार करणारे इसम व त्यांची जागा याबाबत गोपनीय माहिती काढण्यात आली. त्यानंतर जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे व राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी व अंमलदार यांनी एकाच वेळी अशा ठिकाणी छापा टाकून कारवाई करणेबाबत नियोजन करण्यात आले होते.
9 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सर्व पोलीस ठाण्याचे, स्थानिक गुन्हे शाखेचे व राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी व अंमलदार यांनी जिल्ह्यातील टेक भिलाटी परिसरात, प्रकाशा, दुधखेडा, चिरखान, मानमोड्या, गोगापूर, भोंगरा, फत्तेपूर, राणीपूर, सुलवाडे, बोरपाडा, तारपाडा, चिंचपाडा, बिलमांजरे, भवर, उमर्टी, सारंगखेडा इत्यादी ठिकाणी एकाचवेळी 42 छापे टाकून गावठी हात भट्टीची दारु तयार करण्यासाठी लावण्यात आलेल्या भट्टया उध्वस्त केल्या. त्यात 1 लाख 85 हजार 540 रुपये किमंतीचे 5.180 लिटर गावठी हात भट्टीची दारु तयार करण्यासाठी उपयोगी पडणारा महू फुलांचा सडका वॉश, 1 लाख 95 हजार 600 रुपये किमतीची 4 हजार 897 लिटरगावठी हात भट्टीची दारु, 94 हजार 400 रुपये किमतीचे साहित्य तसेच 45 हजार 900 रुपये किमतीचे विदेशी दारु बनविण्यासाठी उपयोगी पडणारे 35 ली. स्पिरीट असा एकूण 5 लाख 21 हजार 440 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच गावठी हातभट्टीची दारु व दारु निर्मीत करणेकामी उपयोगी पडणारा महु फुलांचा सडका वॉश व साहित्य व विदेशी दारु बनविण्यासाठी उपयोगी पडणारे स्पिरीटची वाहतूक करणारे 42 इसमांविरुध्द् संबंधीत पोलीस ठाण्यांना एकूण 42 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडुन गुन्हेगारांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या कारवाईमुळे हातभट्टीची दारु निर्मित व वाहतुक करणाऱ्यांवर कायद्याचा धाक निर्माण झालेला असुन नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्रीमती स्नेहा सराफ यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांचेसह सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकांनी केलेली असुन पुढील काळात देखील हातभट्टीची दारु निर्मित करणारे व देशी विदेशी दारुची चोरटी विक्री व वाहतुक करणाऱ्यांविरुध्द् अशीच प्रभावीपणे मोहीम राबविण्यात येईल असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.








