शहादा l प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत बॅडमिंटन व टेबल टेनिस आंतर महाविद्यालयीन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. बॅडमिंटन स्पर्धेत कृषी महाविद्यालय पुणे मुले व मुली तर टेबल टेनिस स्पर्धेत कृषी महाविद्यालय पुणे मुले आणि कृषी महाविद्यालय मुली धुळे विजेता ठरले.
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात आयोजित दोन दिवशीय राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंडळाचे संचालक रमाकांत पाटील होते. पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार दीपक गिरासे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दीपक पाटील, कृषी महाविद्यालय पुणेचे क्रीडा अधिकारी प्रा. डॉ.ए.जे.नलावडे, प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, प्राचार्य रवींद्र एस. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एल. पटेल उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना तहसीलदार श्री.गिरासे म्हणाले, खेळासोबतच नियमित अभ्यासही करा. आपण ठरविले तर यश निश्चित प्राप्त होते. त्यासाठी परिश्रम व प्रयत्न आवश्यक आहेत. मेहनतीचे फळ मिळतच असते. प्रयत्नातून यशस्वी होता येते. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या संघाचे कौतुक करत इतरांनी पुन्हा प्रयत्न करत कराव्यात अशा शुभेच्छा श्री. गिरासे यांनी दिल्या.
मयूर पाटील यांनी म्हटले, कृषी शिक्षणाचा शेतकरी व समाज विकासासाठी उपयोग व्हावा. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीसह शेतकरी आत्महत्यासारखे प्रश्न सोडविण्यासाठी शेती व शेतकरी बांधवांसाठी काही नवीन प्रयोग करण्यासंबंधी विद्यार्थी दशेतच विचार करण्यात यावा असेही त्यांनी आवाहन केले.तसेच या स्पर्धेत सहभागी राज्यातील विविध कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.अध्यक्षीय समारोपात रमाकांत पाटील यांनी स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचा निकाल असा:-
बॅडमिंटन (मुली) – प्रथम कृषी महाविद्यालय पुणे, द्वितीय कृषी महाविद्यालय जैनापुर, तृतीय कृषी महाविद्यालय बारामती.
बॅडमिंटन (मुले) – प्रथम कृषी महाविद्यालय पुणे, द्वितीय कृषी महाविद्यालय वडाळा, तृतीय कृषी महाविद्यालय नाशिक.
टेबल टेनिस (मुली)- प्रथम कृषी महाविद्यालय धुळे, द्वितीय कृषी महाविद्यालय पुणे, तृतीय कृषी महाविद्यालय जैनापुर.
टेबल टेनिस (मुले)- प्रथम कृषी महाविद्यालय पुणे, द्वितीय कृषी महाविद्यालय धुळे,तृतीय कृषी महाविद्यालय कोल्हापूर.
पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रशेखर पाटील यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. पी. एल. पटेल यांनी मानले.स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ.भरत चौधरी, महाविद्यालयाचे प्राध्यापक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. स्पर्धा यशस्वी संपन्न होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील,उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दीपक पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एल. पटेल यांचे मार्गदर्शन लाभले.