नंदुरबार l प्रतिनिधी
एस.टी. महामंडळाचे काही बसचालक, वाहक मनमानी करत बसेस उभ्या करत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी व पालकांनी काल दुपारी तालुक्यातील रनाळे येथे रास्तारोको आंदोलन करत वाहतूक रोखली. यामुळे या रस्त्यावर बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. संबंधित प्रशासनाने यानंतर आता बसेस थांबतील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
नंदुरबार शहरात ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. विद्यार्थ्यांना शहरात येणे सोयीचे व्हावे यासाठी एस.टी. महामंडळाच्या पासेसचा लाभ घेतात. यामुळे प्रवास दरात सवलत मिळते. असे असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र बऱ्याचदा अनेक बसचालक व वाहक बसेसच उभ्या करत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. खासगी वाहनाचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना शाळेच पोहचावे लागते. यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. तर दुसऱ्या बाजूला शाळेत उशिर झाल्यामुळे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती असते.
यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी व पालकांनी आज दुपारी तालुक्यातील रनाळे येथे रास्तारोको केले. खरे तर रनाळे येथे १० ते १५ गावातील विद्यार्थी एकत्र येतात. मात्र या ठिकाणी बसेसच उभ्या राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, विद्यार्थी व पालकांनी वाहतूक रोखल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेत यानंतर बसेस उभ्या राहतील असे आश्वासन दिल्यानंतर सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले
.








