नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील बालआमराई रस्त्यावर बालाजी इंटरप्राईजस ऑईल रिपॅकिंग कंपनीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. ग़ुजरात राज्यातील व्यारा, सोनगड तसेच नवापूर नंदुरबार येथील अग्निशमक दलाचे जवान आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.
अधिक माहिती अशी की, विसरवाडी जवळ असलेल्या बालआमराई गावाचा शिवारात बालाजी इंटरप्राईजेस ऑईल रिपॅकिंग कंपनी आहे. या कारखान्याला काल सायंकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केले. माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. आग विझविण्यासाठी गुजरात राज्यातील व्यारा, सोनगड, नवापूर, नंदुरबार येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.
अग्निशमन बंबांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरु होते. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी विसरवाडी पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, पोहेकॉ.दिनेश चित्ते, पोलीस नाईक अनिल राठोड यांच्यासह पोलीस कर्मचारी परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.








