नंदुरबार l प्रतिनिधी
खा.डॉ.हीना गावित यांच्याकडे समितीच्या बैठकीत नंदूरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात झालेल्या घरकुल घोटाळ्याबाबत दिशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारकडे याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार झालेल्या चौकशीत सुमारे ३५० लाभार्थी बोगस असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.
या लाभार्थ्यावर कारवाई करुन सदरची रक्कम वसूल करुन खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचे खा.डॉ.हीना गावित यांनी सांगितले.
देशातील ग्रामीण भागातील गरजू व गोरगरीब कुटूंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान घरकुल योजना सुरु केली आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, धडगाव व अक्कलकुवा या भागामध्ये घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. दिशा समितीच्या बैठकीप्रसंगी सन २०२२ मध्ये खा.डॉ.हीना गावित यांच्याकडे याप्रकरणी तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार खा.डॉ.गावित यांनी या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करुन खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती.
यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश संबंधित यंत्रणेला प्राप्त झाले होते. चौकशीदरम्यान, काही जणांचे अनुदान हडप झाल्याचे प्रकार निदर्शनास आले तसेच आधार क्रमांक, बनावट रेशनकार्ड वापरुन खाते उघडून अनुदान लाटल्याचे देखील दिसून आले. याशिवाय घरकुल एकाच्या नावावर तर अनुदान दुसऱ्याच्या नावावर, तसेच खऱ्या लाभार्थ्याला डावलून बोगस लाभार्थ्याला घरकुल मंजूरी असे प्रकार निदर्शनास आले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीअंती सुमारे ३५० बोगस लाभार्थी असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अशा बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करुन खऱ्या लाभार्थ्याला न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे खा.डॉ.हीना गावित यांनी सांगितले.
तसेच बोगस लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करुन खऱ्या लाभार्थ्याला मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचेही डॉ.गावित यांनी सांगितले. येत्या आठवडाभरात संबंधित बोगस लाभार्थ्यांची नावे समजल्यानंतर यानंतरची पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, यामुळे मात्र बोगस लाभार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे.








