नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील बालवीर चौक परिसरातील श्री पिंपळेश्वर महादेव हनुमान मंदिरातील शिवलिंग पिंडीवर साक्षात भोलेनाथ शंकराचे प्रतिबिंब दिसून आल्याच्या चर्चेला उधाण आल्याने भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली.
सध्या अधिक मास सुरू् असल्याने नेहमी प्रमाणे श्री पिंपळेश्वर महादेव हनुमान मंदिरात महिला भाविकांतर्फे भजन कीर्तन सुरू होते . शनिवारी रात्री एकादशीस पिंपळेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंग पिंडीवर साक्षात शंकर भोलेनाथ यांचे स्पष्ट प्रतिबिंब अचानक एका भाविक महिलेच्या निदर्शनास आले असल्याचे सांगण्यात आले.काही क्षणात सदर वार्ता शहरात पसरली.यामुळे शिवलिंग पिंडीवरील भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी आबाल वृद्धांसह महिला पुरुष भाविकांनी एकच गर्दी केली.

दोन महिन्यापूर्वीच बालवीर चौक परिसरात श्री पिंपळेश्वर महादेव हनुमान मंदिराची निर्मिती करण्यात आली होती. यानिमित्त मध्य प्रदेश राज्यातील सिहोर जवळील बकावा येथून शिवलिंग पिंड आणण्यात आली. नंदीसह असलेल्या मंदिरात गणपती आणि हनुमानाची मूर्ती देखील आहे.
शनिवारी रात्री उशिरापर्यंत बालवीर चौक परिसरात नवा भोईवाडा, गवळीवाडा, देसाई पुरा, नवनाथ नगर, कुंभारवाडा, डॉ. आंबेडकर चौक आणि शहरातील इतर भागातील भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. अनेक भाविकांनी मोबाईलवर चित्रित करून सोशल मीडिया वर प्रसारित केल्याने शिवलिंग पिंडीवरील प्रतिबिंबित शंकर भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या. मध्यरात्री दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली.








