नंदुरबार l प्रतिनिधी
शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २०२३ च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत आपला सहभाग ऑनलाईन नोंदवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन करताना श्रीमती खत्री यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या ४ जुलै, २०२३ च्या शासन निर्णयान्वये वर्ष २०२३ मध्ये गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत राज्यातील ३ विजेत्या सार्वजनिक उत्सव गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम ₹ ५ लक्ष, द्वितीय क्रमांकासाठी ₹ २.५० लक्ष व तृतीय क्रमांकासाठी ₹ १.०० लक्ष आणि जिल्हा स्तरीय समितीने निवड केलेल्या एका विजेत्या सार्वजनिक उत्सव गणेशोत्सव मंडळास रोख रक्कम ₹ २५ हजार चे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल. या पुरस्काराच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे.
स्पर्धेत, धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या व स्थानिक पोलीसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचे mahotsav.plda@gmail.com या ई- मेल वर विहीत नमुन्यात ०५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत.
हा अर्जाचा नमूना शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४. जुलै २०२३ च्या शासन निर्णयातील सोबतच्या परिशिष्ट “अ” मध्ये देण्यात आला आहे. तसेच पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी कार्यपद्धत नमूद करण्यात आली आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०७०४१६३११८२१२३ असा असल्याचेही श्रीमती खत्री यांनी नमूद केले आहे.
वर्ष २०२३ मध्ये गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी आयोजित स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.








