नंदूरबार l प्रतिनिधी

चाँदसैली घाटात दरड कोसळल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने श्रमदानाने 9 किमीचा रस्ता साफ केला असून पोलीस दलाने पुन्हा माणुसकीचे दर्शन दिले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व धडगांव या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या मार्गावर चाँदसैली हा घाट असून दरवर्षी जून महिन्यात सुरु होणाऱ्या पावसामुळे या मार्गावर नेहमी दरड कोसळून वाहतूक ठप्प होते. त्यामुळे धडगांव तालुक्यातील गावांचा तळोदा तालुक्याशी पर्यायाने जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत होते. काही वेळेस दरड कोसळल्यामुळे अपघात होवून जिवीत हानी देखील होते.
दि.23 मे 2023 रोजी वावी ता. धडगांव येथून घराची कौले घेण्यासाठी तळोदा मार्गे वेलदा ता. निझर जि. तापी गुजरात येथे जात असतांना चाँदसैली घाटातील तीव्र उतारावर पिकअप वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने सदर पिकअप वाहनाचा अपघात होवून चार जण जागीच ठार होवून तीन जण जखमी झाले होते. तसेच तीन ते चार दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे धडगांव ते तळोदा रोडवरील चाँदसैली घाटात दरड कोसळून मोठ मोठे दगड रस्त्यांवर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

यावर्षी जून महिन्यात सातपुड्याच्या वरच्या भागात पाऊस होवून चाँदसैली घाटात दरड कोसळून त्याचा वाहतूकीला अडथळा होत असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्या होत्या. त्यामुळे सुटी संपवून जिल्ह्याच्या विविध ठिकाणी असलेल्या आश्रम शाळांमध्ये शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच पाऊस झाल्यामुळे पेरणीसाठी आवश्यक असलेल्या शेती विषयक बाबींच्या खरेदी करण्यासाठी तळोदा किंवा नंदुरबार येथे जाणाऱ्या शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना या सर्व अडचणी / समस्या माध्यमातून समजल्या होत्या.
सामाजिक बांधीलकीच्या जबाबदारीचा एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी तळोदा तालुक्यातील चाँदसैली घाटातील परिस्थितीची पाहणी करुन आढावा घेतला व चाँदसैली घाटात श्रमदान करुन रस्ता मोकळा करण्याची संकल्पना मांडली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अक्कलकुवा उप विभागातील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कोठार गावाच्या परिसरातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने चाँदसैली घाटात श्रमदान करण्याची योजना आखली.
दि. 4 जुलै 2023 रोजी तळोदा तालुक्यातील कोटार दुरक्षेत्र येथून ते चाँदसैली या 9 ते 10 कि.मी. दरम्यानचा घाटरस्ता सकाळी 9 वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी शसदाशिव वाघमारे यांच्यासह न्यू हायस्कूल तळोदा येथील स्काऊट गाईड व एन.सी.सी चे विद्यार्थी, गृह रक्षक दलाचे जवान, कोठार व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक व अक्कलकुवा विभागातील 100 पोलीस अधिकारी व अंमलदार असे एकुण 150 ते 200 जणांनी मिळून चाँदसैली घाटात रस्त्याच्या बाजुला असलेले खड्डे दगड, मुरुम टाकून खड्डे भरणे, रस्त्यांवर पडलेले दगड रस्त्यावर कोसळलेली दरड जेसीबी च्या सहाय्याने बाजूला करणे इत्यादी प्रकारचे श्रमदान केले. यावेळी वरिष्ट अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी स्वत: हातात फावडे घेवून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यांमध्ये माती टाकून व रस्त्यांवर पडलेले दगड रस्त्याच्या बाजूला सरकावून श्रमदान केले. पावसामुळे दरड कोसळून रस्त्यावर आलेले दगड, मातीचे ढिगारे बाजूला झाल्याने चाँदसैली घाटाने मोकळा श्वास घेतला आहे.
समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या दोन स्थानिक नागरिकांनी या श्रमदानासाठी 2 जेसीबी उपलब्ध करुन दिले. जेसीबीच्या मदतीने वळण रस्त्यावर डोंगर उतारावरून वाहून आलेली माती, मोठे दगड दुर करण्यात आले. तसेच काही ठिकाणी खचलेला रस्ता भराव टाकून दुरुस्त करण्यात आला. वळण रस्त्यावरील वाहतूकीला अडथळा ठरणारे मातीचे ढोग बाजुला झाल्याने वाहन चालकांना वाहन चालविणे सुलभ झाले आहे.
श्रमदान करीत असतांना पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाची गरज लक्षात घेता, स्काऊट गाईडच्या विद्याथ्र्यांनी तयार केलेल्या सीड बँकेतील बिया घाटातील विविध भागात रोवण्यात आल्या. तसेच उपस्थित अधिकारी व अंमलदार यांच्या हस्ते कोठार पोलीस दूरक्षेत्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून आयोजीत श्रमदान कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थी, शिक्षक व कोठार गावातील नागरिक हे स्वेच्छेने उपस्थित राहिले. त्याबद्दल पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने मान्सूनपूर्व योग्य ती सर्व तयारी केली असून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिलेले आहेत. पूर परिस्थिती किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत करण्यासाठी पोलीस ठाणे व पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोहणारे, शोध व बचाव साधनांची उपलब्धता करुन ठेवण्याचे देखील निर्देश दिले आहेत. आपत्कालीन मदतीसाठी नागरिकांनी तात्काळ डायल-112 या टोल फ्री क्रमांकावर अगर नजीकच्या पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सज्ज असून त्याबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी प्रत्येक पोलीस ठाणे येथे 2 प्रशिक्षीत कर्मचारी असून आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारे जेसीबी, क्रेन, लाईफ जॅकेट दोर इत्यादी साहित्य उपलब्ध करुन ठेवण्यात आलेले आहे.
सदर श्रमदान करुन चाँदसैली घाटरस्ता मोकळा करण्याचा उपक्रमात पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, मोलगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनराज निळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, तळोदा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश केदार, अमितकुमार बागुल, धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक राहुल पाटील यांच्यासह अक्कलकुवा उप विभागातील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार, कोठार गावाच्या परिसरातील नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.









