नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्त घोषित होणार असून 23 जून रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील हे 23 जुन रोजी नंदुरबार जिल्हा भेटीसाठी येणार आहेत. सदर भेटी दरम्यान ते नंदुरबार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हे आढावा यांचेसह नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचा आढावा घेणार आहेत.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने मागील वर्षी अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये केलेल्या कारवाया पाहून
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी अंमली पदार्थ मुक्त जिल्हा होवू शकेल अशी सूचना मांडली होती. त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी कारवाया करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ मुक्त जिल्हा या मोहिमेचा शुभारंभ
1 मार्च 2023 रोजी झाला. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने राबविलेल्या विविध उपक्रमांचा तसेच केलेल्या कारवायांचा आढावा यावेळी घेण्यात येणार आहे. याच दिवशी नंदुरबार जिल्हा हा अंमली पदार्थ मुक्त जिल्हा घोषीत करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अंमली पदार्थांची शेती, अंमली पदार्थ बाळगणे, त्याची वाहतूक करणे, त्याची विक्री करणे यावर यापूर्वीच प्रतिबंध करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी कायद्याचे पालन न करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द् छापा कारवाई करुन कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
1 मार्च 2023 रोजी पासून सुरु करण्यात आलेल्या अंमली पदार्थ मुक्त जिल्हा या उपक्रमादरम्यान पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने गांवोगावी शाळा / महाविद्यालयात जावून अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्याचे कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच उर्वरीत शाळा / महाविद्यालयांमध्ये देखील अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्हा घटकातील सर्व ग्रामपंचायतीकडून अंमली पदार्थ विरोधी ठराव घेण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्त झाल्याचे घोषित करण्यात येईल.
अंमली पदार्थ मुक्त जिल्हा हा उपक्रम यशस्वी व्हावा त्याची माहिती जिल्हा घटकातील तळागळापर्यंत व्हावी याकरीता पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील गाव पातळीवर पोलीस पाटील, गावातील नागरिक तसेच शाळा महाविद्याल येथे आज पर्यंत एकुण 206 बैठका घेण्यात आल्या आहेत. उपक्रमाबाबत जनजागृती व्हावी याकरीता पोस्टर्स व बॅनर्स यांचे मदतीने जनजागृती करण्यात येत आहे. अंमली पदार्थ याबाबत गोपनीय माहिती पोलीस दलास व्हावी याकरीता 9022455414 हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वीत करण्यात आला असून त्यावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची संबंधीत पोलीस ठाण्यांकडून तातडीने दखल घेवून कारवाई करण्यात येते.
तसेच तक्रारदार यांची माहिती गोपनीय ठेवली जाते.
23 जुन 2023 रोजी सकाळी 9 वाजता पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील कवायत मैदानावर जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्याचा कार्यक्रम होईल. सदर कार्यक्रमासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांचेसोबत विविध शाळांचे प्राचार्य, शिक्षक तसेच पोलीस पाटील देखील उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर नंदुरबार शहर पोलीस ठाणे समोरील रस्त्याचे बाजूला असलेल्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती फलकाचे अनावरण त्यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
संभाव्य गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व घडलेल्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीतांना शोधून अटक करण्यासाठी एक कॅमेरा पोलीसांसाठी या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचे संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचे उद्घाटन शहादा शहरातील जुन्या पोलीस ठाणे जवळ व्यापारी तसेच नागरिकांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर शहादा शहरातील कुकडेल परिसरात आगामी सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी मोहल्ला कमिटी सदस्यांची बैठक विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे उपस्थितीत होईल.
तसेच 23 जुन 2023 रोजी दुपारी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा पोलीस दलाकडून उघडकीस आणलेल्या दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी यासारख्या जिल्ह्यात मालमत्तेच्या गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमाल व नागरिकांचे गहाळ / हरविलेले मोबाईल असा एकुण सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल मुळ तक्रारदारांना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांच्या हस्ते परत करण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी अंमली पदार्थ मुक्त जिल्हा या कार्यक्रमासाठी पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर 23 जुन 2023 रोजी सकाळी 9 वाजता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.








