मुंबई l प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार शाळकरी, महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून 3 ते 15 जुलैदरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, उपसचिव श्री. ठाकूर, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, भारतीय स्त्री शक्ती संस्था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.








