नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील शनिमांडळ येथील शनि देवाचे मंदिर साडेसाती मुक्तीपीठ म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शनि अमावस्येनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी दिवसभर शनिदेवाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी पंचक्रोशितील भाविकांसह शेतकर्यांनी शनीदेवांना यावर्षी चांगला पाऊस पडू दे असे साकडे घातले आहे.
यावर्षी मंदिराचे काम पूर्ण झाले असून जीर्णोद्धार झाल्यानंतर भाविकांनी लाखोंच्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला. मंदिरावर दोन दिवस आदीच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यामुळे परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. शनैश्वर ट्रस्ट व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यात होत्या तसेच स्वयंसेवकांनी दिवसभर परिश्रम घेऊन भाविकांना दर्शनासाठी सोय उपलब्ध करून दिली.
ज्येष्ठ महिन्यात येणार्या पहिल्या अमावस्येला शनिमांडळ येथे शनिअमावस्या निमित्त यात्रा उत्सव भरविला जातो. शनि महाराजांचे मंदिर साडेसाती मुक्त ठिकाण म्हणून खान्देशासह महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यातील भाविक दर्शनासाठी हजेरी लावून मनोकामना पूर्ण करतात. शनि अमावस्या दिवसभर असल्याने दर्शनासाठी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. बाहेरगावाहून येणार्या नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन शनैश्वर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.
महाप्रसादाचे वाटप मंदिरालगत असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळेत करण्यात आले होते. महाप्रसादासाठी गावातील प्रत्येक घरातून भाकरीचा प्रसाद देण्यात येत असतो तसेच ट्रस्टच्या वतीने पिठले करण्यात येते तो प्रसाद म्हणून भाविकांना वाटप करण्यात येतो. या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. यावेळी तालुका पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यात्रोत्सवात अनेकांनी नारळ, तेल आणि हॉटेलसह खेळणीचे साहित्य विक्री आणि संसारोपयोगी वस्तूंच्या दुकानी थाटण्यात आल्या होत्या. त्यातून लाखो रूपयांची उलाढाल झाली आहे.








