नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पिप्राणी येथील बालविवाह रोखण्यात म्हसावद पोलीसांना यश आले आहे.आतापर्यंत २७ बालविवाह रोखण्यात यश आले आहे.
बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांच्या संकल्पनेतून “ऑपरेशन अक्षता” हा उपक्रम यावर्षी 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु करण्यात आला आहे. 14 जुन 2023 रोजी पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांना माहिती मिळाली की, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील पिप्राणी गावात 14 जून 2023 रोजी एका अल्पवयीन मुलीचा चिरडे ता. शहादा येथील तरुणाशी बालविवाह होणार आहे. सदरची माहिती पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना कळवून सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करणेबाबत आदेशीत केले.
त्याप्रमाणे म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी म्हसावद पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या सदस्यांच्या मदतीने तात्काळ माहिती काढली असता, पिप्राणी गावातील एका अल्पवयीन मुलीचा चिरडे गावातील एका तरुणासोबत विवाह निश्चित करुन 14 जुन 2023 रोजी साखरपुडा कार्यक्रम होणार असल्याचे समजले, परंतु त्यापूर्वीच म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार व त्यांच्या पथकाने अल्पवयीन मुलीच्या घरी जावून अल्पवयीन मुलगी, वर मुलगा व त्यांचे कुटुंबीय, व गावातील नागरिक कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांचे समुपदेशन करुन त्यांना बालविवाह करण्यापासून परावृत्त केले. पिप्राणी येथील अल्पवयीन मुलगी, वर मुलगा व त्यांचे कुटुंबीय, व गावातील नागरिकांचे समुपदेशन करुन मनपरिवर्तन केले. तसेच तेथे कार्यक्रमाला उपस्थित असलेले नातेवाईक व नागरिकांना बालविवाहाबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन जनजागृती केली. अल्पवयीन मुलीच्या व वर मुलाच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली. तसेच अल्पवयीन मुलगी व वर मुलाच्या पालकांना म्हसावद पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.
सदर अल्पवयीन मुलीला बालकल्याण समिती नंदुरबार यांचे समक्ष हजर करुन तिचेे व तिच्या कुटुंबीयांचे सदर समितीमार्फत समुपदेशन करुन सदर अल्पवयीन मुलगी 18 वर्षे वयाची होई पर्यंत तिचे शिक्षण, आरोग्य व कल्याणाची जबाबदारी सदर समितीमार्फत घेतली जाईल, जेणेकरुन सदर अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षताचे नंदुरबार पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे. नंदुरबार जिल्हा पोलीसांना ऑपरेशन अक्षतांतर्गत तब्बत 27 बालविवाह रोखण्यात यश आले आहे असे नंदुरबार अधीक्षक पी.आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, सहा. पोलीस उप निरीक्षक प्रदिपसिंग राजपुत, पोलीस हवालदार कलीम रावताळे, पोलीस अंमलदार राकेश पावरा, महिला पोलीस अंमलदार वर्षा पानपाटील, पिप्राणी गावाचे माजी पोलीस पाटील भिमसिंग चौधरी यांनी केली आहे.








