नंदुरबार l प्रतिनिधी
ऑपरेशन अक्षता सुरु झाल्यापासून तीन महिन्याच्या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांनी 26 बालविवाह रोखण्यात अक्षता समितीस यश आले आहे.
बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून “ऑपरेशन अक्षता” हा उपक्रम यावर्षी 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु करण्यात आला आहे.
आदिवासी बहूल नंदुरबार जिल्ह्यात बालविवाह होणे, परंतु त्याबाबत कोणतीही तक्रार न होणे, ते विवाह झाल्याचे समोर न येणे यासारख्या गोष्टी घडत आहेत, हे मान्य करायला हवे. नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे, तर सर्व देशभरात बाल विवाह ही गंभीर समस्या आहे. 18 वर्षापेक्षा कमी वयात मुलीचे व 21 वर्षापेक्षा कमी वयात मुलाचे लग्न झाल्यास त्याचे अनेक दुरगामी व दुष्परिणाम त्यांच्या जीवनावर पर्यायाने कुटुंबावर आढळून येतात. बाल विवाह हा त्यांच्या अधिकाराचे उल्लंघन असून त्याचे अनेक शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होतात. बाल विवाह झालेल्या मुलींचा शारीरिक विकास तर पुरेसा झालेला नसतो अशा स्थितीत त्यांना गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी आवश्यक असलेले शरीर व मन त्यांच्याकडे नसते. या सर्वांचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर देखील होतो. त्यात दोन पेक्षा अधिक बाळंतपण झाली तर कुपोषणासारखी गंभीर समस्या निर्माण होते.
बाल विवाह रोखणे ही समाज घटकातील प्रत्येकाची जबाबदारी असून गुन्ह्याच्या दृष्टीने विचार केला असता पोलीस अधिकारी म्हणून बाल विवाह रोखणे ही एक महत्वाची जबाबदारी आहे. वरील सर्व बाबींचा सांगोपांग विचार करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या मार्फतीने “ऑपरेशन अक्षता” हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. बाल विवाह रोखण्याबरोबरच महिला व मुली यांच्या हरविण्याच्या, अपहरण होण्याच्या, लैंगिक गुन्ह्यांच्या तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांबाबत देखील या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना करणे शक्य होणार आहे. तसेच जिल्ह्यात घडणारा प्रत्येक बाल विवाह रोखला जावून शेवटच्या घटकापर्यंत बाल विवाह विरोधी जागरुकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गांव पातळीवर आशा स्वयंसेवीका, पोलीस पाटील, सरपंच, प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारीका व पोलीस बिट अंमलदार यांची भुमिका असणार आहे. गाव पातळीवर होणारे बाल विवाह या सर्व घटकांच्या माध्यमातून निश्चीतपणे रोखले जावू शकतात.
नंदुरबार जिल्ह्यात 634 ग्रामपंचायती असून सर्व ग्रामपंचायतींनी ऑपरेशन अक्षता सुरु झाल्यानंतर फक्त महिन्याभराच्या काळात स्वंयस्फुर्तीने बालविवाह विरोधी ठराव घेवून ऑपरेक्षन अक्षता या उपक्रमास पाठिंबा दिला आहे. ऑपरेशन अक्षता हा उपक्रम सुरु झाल्याने ग्रामीण भागात प्रत्यक्ष काम करणाऱ्या ग्रामसेवक, पोलीस पाटील, बीट अंमलदार, प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारीका तसेच आशा स्वयंसेविका यांना प्रेरणा मिळून त्यांनी उपक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस दलास सहकार्य केले आहे.
ऑपरेशन अक्षता सुरु झाल्यापासून तीन महिन्याच्या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात 26 बालविवाह रोखण्यात अक्षता समितीस यश आले आहे. पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलला एखाद्या ठिकाणी बालविवाह होत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे महिला व बालविकास विभाग तसेच ग्राम स्तरावरील अक्षता सेलचे सदस्य हे तातडीने जावून कुटुंबीयांना कायदेशीर बाबी समजावून सांगून बालविवाह होत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या तसेच मुलीच्या पालकांचे समूपदेशन करतात. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले नातेवाईक व नागरिकांना बालविवाहाबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन जनजागृती करुन अल्पवयीन मुलाच्या व मुलीच्या पालकांना संबंधीत पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात येते.
बालविवाह हा कायदेशीर अपराध असून तो घडवून आणणाऱ्या व्यक्तीवर तसेच विवाहात हजर असणाऱ्या वन्हाडी, बँड पथक, विवाह लावणारे भटजी, आचारी, मंडप डेकोरेटर्स यांचेवर देखील कारवाई करण्यात येत असल्याने पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेकडून बँड पथक, विवाह लावणारे भटजी, आचारी, मंडप डेकोरेटर्स यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस ठाणे स्तरावर त्यांच्या बैठका घेवून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
सर्वसामान्य नागरिकांना बालविवाहाबाबत तक्रार करणे सोयीचे व्हावे यासाठी चाईल्ड लाईन या समाजसेवी संस्थेच्या 1098 या हेल्पलाईन क्रमांकाबरोबरच जिल्हा पोलीस दलाकडून 9022455414 हा हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस दलाकडून सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यास मिळणाऱ्या तात्काळ प्रतिसादाने नागरिकांच्या मनात पोलीसांबद्दल विश्वास वृध्दी ंगत होत आहे. बालविवाह मुक्त जिल्हा होण्यासाठी सुरु करण्यात आलेला ऑपरेशन अक्षता हा उपक्रम निश्चित मैलाचा दगड ठरेल.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, बालकांचा विवाह करणे हा कायदेशीर गुन्हा असून तो करणाऱ्या व्यक्तीवर तसेच विवाहात हजर असणाऱ्या वऱ्हाडी, बँड पथक, विवाह लावणारे भटजी, आचारी, मंडप डेकोरेटर्स यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आपल्या परिसरात बालविवाह होत असेल त्याबाबतची माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा ऑपरेशन हेल्पलाईन क्रमांक 9022455414 व चाईल्ड लाईन हेल्पलाईन क्रमांक 1098 यावर संपर्क साधवा असे आवाहन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.








