मोलगी। वार्ताहर (रविंद्र वळवी)
नर्मदेची उपनदी असलेल्या उदय नदीवर ओरपा ता. अक्कलकुवा येथे अनेक गावांमधील नागरिकांच्या सुविधेसाठी पुलाची नितांत गरज आहे. पुलच नसल्याने तेथे अनेकांचा बळी गेला. येथे प्रत्येक जण जीव धोक्यात टाकून मार्ग काढत आहे. एवढेच नव्हे तर ओरपा गावाची स्मशानभूमी नदीच्या दुसऱ्या बाजूलाच असून प्रेत नेण्यासाठी देखील नदीतूनच मार्ग काढावा लागतो. यावर मात करण्यासाठी पुल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
उदय नदी ही नर्मदा नदीच्या खोऱ्यात उगम पावलेली उपनदी व सातपुड्याच्या मोठ्या भूभागातून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी अनेक गरजा पूर्ण करुन जातेय तशी ती पुल नसलेल्या ठिकाणी अडचणीची ठरत आहे. सर्वात मोठी नदी असल्याने यावर ठिकठिकाणी पुल बांधणे आवश्यक आहे. तशीच आवश्यकता ओरपा येथील स्मशानभूमीजवळील ‘पांईंदेया’ या ठिकाणी पुल बांधणे नितांत गरजेचे आहे. या ठिकाणी असलेल्या पायवाटेवरुन ओरपा गावासह उमरागव्हाण, नेंदवण, खुर्चीमाळ, पाटबारा जमाना व अन्य गावातील हजारो आदिवासी बांधव मार्गस्थ होतात. या पायवाटेने जाणे अत्यावश्यक असल्याने प्रत्येक जणाला येथून जावेच लागते, पुल नसला व नदीला पाणी-पुराचा प्रवाह अधिक असला तरी पाण्यातूनच मार्ग काढावा लागतो. प्रवाह अधिक असताना पाण्यातूनच नदी ओलांडणाऱ्या अनेकांना प्राणास मुकावे लागलेत.
हजारो नागरिकांच्या जिवाला निर्माण झालेला धोका कमी करणे व समस्यांवर मात करण्यासाठी स्मशानभूमीजवळील ‘पांईंदेया’ या ठिकाणी पुल बांधण्यात यावा अशी मागणी माजी सरपंच शंकर खाअल्या वसावे, जितेंद्र बाळकृष्ण वसावे, डिगंबर बाळकृष्ण वसावे, शिवाजी मांगा वसावे, रविंद्र सुनपसिंग वसावे, यशवंत बिंद्या वसावे, केवलसिंग रतनसिंग वसावे, खाअल्या लसमा वसावे, धिरसिंग दिगंबर वसावे, दिलीप रामसिंग वसावे यांनी केली आहे.
शाळकरी बालकांच्या जीवालाही धोका
ओरपा येथे जिल्हा परिषदेची शाळा कार्यान्वित करण्यात आली असून तेथे उदय नदीच्या दोन्ही बाजूला वास्तव्यास असलेले विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी जातात. पुल नसल्याने या शाळकरी बालकांनाही नदीच्या पुरातूनच जावे लागते. त्यामुळे पुलाअभावी ही नदी या मुलांनाही धोक्याची ठरत आहे.
दोन पिता, दोन पुत्राचा गेला बळी
अनेक गावांमधून वाहणारी उदय नदीच्या दोन्ही बाजूने शेतजमीनी आहेत. शेती कामानिमित्त शेतकऱ्यांनाही नदी ओलांडून जावेच लागते. ओरपाच्या सरपंच पाड्यातील रहिवासी कर्मा मंजा वसावे यांचा काही वर्षांपूर्वी उदय नदीच्या पुरानेच बळी घेतला. त्यांचा मृतदेह नातेवाइकांना हाती लागलाच नाही. शेवटी मृतदेहाविना अंत्यविधी करावी लागली. या घटनेला काही वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर मागील वर्षी पुन्हा त्यांचा मुलगा सुनपसिंग कर्मा वसावे हे देखील शेती कामानिमित्तच या नदीतून जातांना ते पुरात वाहून गेले, त्यात त्यांचाही मृत्यू झाला. याशिवाय भामटा नरसी वसावे हे पुरात वाहून न गेले, त्यांचा मृतदेह सापडला नाही. त्यानंर त्यांचा मुलगा इंद्रसिंग भामटा वसावे यांचाही पुरातच मृत्यू झाला.
पुरामुळे अन्यत्र अंत्यविधी
नदीला प्रवाह अधिक असल्याने अनेक दिवंगत बांधवांना स्मशानभूमीपर्यंत नेता आले नाही. परिणामी त्यांच्यावर अन्यत्र अंत्यविधी करावी लागली. त्यात इंद्रसिंग भामटा वसावे यांच्यासह अन्य काही जणांचा समावेश आहे.








