नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमातंर्गत जिल्हा रुग्णालय, नंदुरबार अंतर्गत ‘स्वस्थ मन स्वस्थ तन’ अभियान सुरु असून, यामध्ये समाजातील विविध नागरिकांपर्यंत मानसिक आरोग्य विषयी जनजागृती व्हावी. यासाठी ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे मानसिक आरोग्य जनजागृती रॅली संपन्न झाली.
या रॅलीचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश चकोर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रॅलीमध्ये मानसिक रुग्ण व नातेवाईक यांचा सहभाग होता. यावेळी चिकित्सक मानसशास्त्रज्ञ डॉ.प्रविण डोंगरे यांनी रुग्ण व नातेवाईकांना मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांना चिंता, भिती, उदासी, राग, चिडचिड, आत्महत्येचे विचार, विनाकारण बडबड, व्यसन, इ. मानसिक समस्यांबद्दल उपचार व समुपदेशनासाठी जिल्हा रुग्णालय,नंदुरबार येथील ओपीडी क्रमांक 109 ला संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. रॅलीत मानसिक आरोग्य असते आपल्या हाती,14416 ला कॉल करा, तुमच्या आरोग्यासाठी “स्वस्थ मन स्वस्थ तन” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्यात.
ही रॅली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के. डी.सातपुते, वैद्यकीय अधिक्षक डॉ. स्नेहल गवळी, मानसोपचार तज्ञ डॉ. वंदना सोनोने, डॉ. चंद्रकांत जोशी, डॉ. दिनेश वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुणा चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्या बुंदेले यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनस्वास्थ मंडळाचे दिलवर पावरा, सुभाष पाडवी तसेच ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.








