नंदुरबार l प्रतिनिधी
बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रीदवाक्य घेऊन सर्व सामान्यांची जीवनवाहिनी ठरलेली एसटी कधी कधी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरते. अहो आश्चर्य म्हणजे नंदुरबारहुन धुळ्याला जाण्यासाठी तब्बल सहा तासांचा प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार दि. 12 मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास नंदुरबार आगारातून एम. एच. 20 बी. एल. 14 20 क्रमांकाची लालपरी मार्गस्थ झाली.मात्र दीड ते पावणे दोन वाजेच्या सुमारास धावडे गावानजीक सदर बस नादुरुस्त झाली.प्रवाशांनी उतरून बसला धक्का देण्याचा प्रयत्न केला.परंतु कालबाह्य झालेली बस जागेवरून हलण्याचे नाव घेत नव्हती.तब्बल दोन तास प्रवासी उन्हात ताटकळत उभे राहिले.चालक वाहकासह संतप्त आणि त्रस्त प्रवाशांनी नंदुरबार आणि दोंडाईचा आगारात वारंवार संपर्क करून देखील कुणीही प्रतिसाद दिला नाही.
लग्न समारंभांचा हंगाम आणि सुट्ट्या असतांना नंदुरबार आगारातून धुळ्यासाठी वाढती प्रवासी संख्या असून बस उपलब्ध होऊ शकली नाही. यामुळे नंदुरबार ते धुळे 90 कि.मी. तब्बल सहा तासांचा प्रवास सहन करीत प्रवाशांना मनस्ताप झाला. दोन तास उन्हात थांबल्यानंतर नंदुरबार- चाळीसगाव बस आली.त्यातही अर्धवट प्रवाशांना धुळ्यासाठी घेण्यात आले.यामुळेच नंदुरबार ते धुळे असा सहा तासांचा प्रवास घेण्याची वेळ आल्याने प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार
यांच्या बदली नंतर मोरे नामक आगार प्रमुख आले.मात्र त्यांनी देखील दोनच दिवसात पदभार सोडून इतरत्र जाणे पसंत केले.यामुळे नंदुरबार आगारावर कुणाचेही नियंत्रण राहिले नसून वाऱ्यावर सोडल्याचे बोलले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नंदुरबार आगाराला नवीन बसेस प्राप्त होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र याबाबत अद्याप अंमलबजावणी झालेली दिसत नाही.सवलतीच्या तिकीट दरांमुळे दररोज एसटी बसेस मध्ये महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे.प्रवाशांच्या सुविधेसाठी चांगल्या स्थितीतील नवीन बसेस तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी धुळे विभागीय नियंत्रक विजय गीते यांच्याकडे केली आहे.








