नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील इस्लामपूर रस्त्यावर प्रवासी ॲपेरिक्षा उलटल्याने महिलेचा मृत्यू तर तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ॲपेरिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथील विनोद तुकाराम ठाकरे हा त्याच्या ताब्यातील ॲपेरिक्षामध्ये (क्र.एम.एच.३९ बी १३४२) प्रवासी बसवून घेऊन जात होता. यावेळी विनोद ठाकरे याने ॲपेरिक्षा भरधाव वेगात चालविल्याने इस्लामपूर येथील एमएसईबीच्या सब स्टेशन समोरील रस्त्यावर ॲपेरिक्षा उलटल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात बायसाबाई रम्या डुडवे या महिलेस गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
तर ॲपेरिक्षातील तीन प्रवासी जखमी झाले असून ॲपेरिक्षाचेही नुकसान झाले. याबाबत अजय रग्या डुडवे यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात विनोद ठाकरे याच्याविरोधात भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण करीत आहेत.








